

Chhatrapati Sambhajinagar water supply department Power outage
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहराच्या पाणीपुरवठा विभागामागे लागलेले शुक्लकाष्ट संपता संपत नसून, तांत्रिक अडचणींमुळे सोमवारी (दि.१४) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास फारोळ्याच्या ३३ केव्ही उपकेंद्रातून विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावरील दोन कंडक्टर आणि पिन इन्सुलेटर तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ५६ व १०० दललि योजनेचा पाणीपुरवठा बंद झाला. त्यामुळे शहरातील पाण्याचे टप्पे एमएसईबीमुळे एक दिवसाने पुढे ढकलण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली आहे.
शहरात सहा ते आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. त्यातच वीज गुल होताच पाणीपुरवठा विस्कळीत होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. सध्या शहराला ५६ आणि १०० दललि. क्षमतेच्या योजनेतून दररोज १४५ ते १५० एमएलडी एवढे पाणी शहरात येत आहे.
मात्र यानंतरही पाच दिवसांआड पाणी देण्याऐवजी आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने वीज पुरवठा खंडित होणे, तांत्रिक बिघाड निर्माण होणे, जलवाहिनी फुटणे हे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यातच सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. काही वेळातच फार-ोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही उपकेंद्रातील विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यामुळे दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास वीज गुल झाली.
त्यामुळे फारोळा येथील ५६ व १०० दललि. क्षमतेच्या योजनेतून शहराला होणारा पाणीपुरवठा बंद झाला. जायकवाडी येथूनही पाणीपुरवठा बंद करण्यात आला. मात्र एमएसईबीच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्तीचे काम सुरू करताच जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले नाही. सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झालेला नव्हता. एमएसईबीच्या अभियंत्यांनी दुरुस्तीसाठी दोन ते तीन तास लागणार असल्याचे कळविल्यामुळे पाणीपुरवठा नेमका कधी सुरू होईल हे सांगता येणार नसल्याचे मनपाच्या अभियंत्यांनी सांगितले.
फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित झाल्याने दोन्ही योजनेचे पाणी बंद झाले. पाणी बंद होऊन अडीच तासांचा कालावधी उलटला आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे जलकुंभ कोरडे झाले आहेत. पाईपलाईनला सब-वे करूनही पाणीपुरवठा करण्यास अडचणी येत आहे. विद्युत पुरवठा सुरू झाल्यानंतरही शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी दोन ते अडीच तास लागतील. सध्या सुरू असलेले टप्पे बंद पडले असून, पाणी सुरू झाले तरी उशिराने हे टप्पे पूर्ण केले जातील. मात्र या पुढचे टप्पे देताना मनपा यंत्रणेची धावपळ उडणार असून, राहिलेले टप्पे एक दिवस पुढे ढकलले जाण्याची शक्यता अभियंत्यांनी व्यक्त केली आहे.
फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा सोमवारी रात्री सव्वासात वाजेच्या सुमारास सुरळीत सुरू करून सव्वाआठ वाजता एक पंप कार्यान्वित करण्यात आला. यावरील लाईन भरल्यानंतर एक तासाने सव्वानऊ वाजता उर्वरित पंप सुरू करण्यात आले. त्यानंतर शहरात पाणी पोहोचून पुरवठा सुरळीत करण्यासाठी सहा तासांचा अवधी लागला.