

छत्रपती संभाजीनगर : गारखेडा परिसरातील विजयनगर वसाहतीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे. आजही त्यांना टँकरने पाणी मागवावे लागत आहे. विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर शिवाजीनगर पाण्याची टाकी आहे. तरीही येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.
अनेक वर्षांपासून या परिसरातील काही गल्ल्यांना पाणी मिळत नाही. त्यांना पाण्याच्या ड्रमसाठी ४० रुपये मोजावे लागत आहेत. या परिसरात पाण्याची पाईपलाईन टाकली, आजपर्यंत यातून नळांना पाणी मात्र आले नाही. त्यामुळे आजही टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. विशेष म्हणजे शिवाजीनगर येथील पाण्याची टाकी या परिसरापासून हाकेच्या अंतरावर आहे. तरीही पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
परिसरातील काही भागांत पाणी उपलब्ध
शिवाजीनगर येथील पाण्याच्या टाकीतून विजयनगरच्या शिवाजीनगरसह आजूबाजूच्या सोसायट्या व कॉलनीत नळांद्वारे पाणीपुरवठा नियमित होत आहे. पण गल्ली नं. १ ते ३ पर्यंत नळांना पाणी येत नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी दहा वर्षांपूर्वी पाईपलाईन टाकली होती, परंतु त्यातून आजपर्यंत पाणीपुरवठा झाला नाही. तसेच आठ महिन्यांपूर्वीच पुन्हा दुसरे कनेक्शन देण्यात आले. त्यातूनही आजपर्यंत पाणीपुरवठा झाला नाही.
पाण्यासाठी देखील राजकारणाचा त्रास होतो
विजयनगरपासून दहा फुटांच्या अंतरावर व्हॉल्व्ह आहे. या ठिकाणी पाईपलाईन जोडून दिल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ, सुटू शकतो, परंतु येथील अंतर्गत राजकारणामुळे नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. ड्रमसाठी पैसे मोजूनही टँकर पाच ते सहा दिवसांनंतर येते. वास्तविक तिसऱ्या दिवशी टँकरचे पाणी मिळणे अपेक्षित आहे, परंतु तेही मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ही समस्या तात्काळ सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.