

Navodaya exam hall ticket issue
नितीन थोरात
वैजापूर : विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारी संतापजनक घटना शहरात शनिवारी (१३) समोर आली. जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान तालुक्यातील महालगाव येथील गुरुकुल विद्यालयातील आठ विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटांमध्ये गंभीर स्वरूपाच्या चुका आढळून आल्याने मोठा गोंधळ उडाला. या चुकीमुळे काही विद्यार्थ्यांना थेट परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला, परिणामी ते परीक्षा देण्यापासून वंचित राहिले आहे.
परीक्षेसाठी सकाळपासूनच विद्यार्थी व पालक मोठ्या अपेक्षेने परीक्षा केंद्रावर उपस्थित होते. मात्र, हॉल तिकीट तपासणीदरम्यान अनेक विद्यार्थ्यांच्या तिकीटावर सीट नंबर चुकीचा किंवा सारखा असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांनाही गोंधळाचा सामना करावा लागला.
या अचानक उद्भवलेल्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. वर्षभर मेहनत घेऊन तयारी केलेल्या विद्यार्थ्यांना केवळ प्रशासकीय चुकांमुळे परीक्षा देता न आल्याने त्यांच्या डोळ्यांत अश्रू तर पालकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळाला. “आमच्या मुलांचे भवितव्य कुणाच्या चुकीमुळे धोक्यात येणार का?” असा सवाल संतप्त पालकांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, ही चूक नेमकी कुणाच्या पातळीवर झाली, याबाबत अद्यापही स्पष्टता नसून शाळा प्रशासन, परीक्षा यंत्रणा की ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत कुठे तरी हलगर्जीपणा झाला, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी तसेच परीक्षेला मुकलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा किंवा पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांकडून केली जात आहे. या प्रकारामुळे संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारा असा निष्काळजी खेळ थांबवण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
* गायत्री बाबासाहेब काळे
•समृद्धी गणेश मिरगे
•वैष्णवी नानासाहेब मिरगे
•अर्णवी अविनाश नवसारे
•वैष्णवी रामेश्वर पाटोळे
•अक्षदा ज्ञानेश्वर गुडदे
•शिवम बाबासाहेब सुंब
•प्रथमेश रविंद्र पवार
मला या प्रकाराची माहिती मिळताच तात्काळ शाळेला भेट दिली. तसेच नवोदय विद्यालय कन्नड येथील प्राचार्य यांना संपर्क केला. प्राचार्यांनी देखील या शाळेला भेट दिली असून याबाबत अहवाल सादर करणार आहेत.
- हेमंत उशीर, गटशिक्षणाधिकारी वैजापूर