

वैजापूर : शहरातील मोबाईल मार्केटमध्ये ‘एमआय’ कंपनीच्या नावाने मोठ्या प्रमाणात विक्री केला जाणारा बनावट उत्पादनांचा व्यवसाय उघडकीस आला आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी धाड टाकत तब्बल १३,५०,८१५ रुपये किमतीचा माल जप्त केला आहे. तसेच चार मोबाईल दुकान मालकांवर कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
‘नेत्रिका कन्सल्टिंग इन्व्हेस्टिगेशन’ या खासगी तपास संस्थेचे तज्ञ विनायक वळवईकर यांनी वैजापूर बाजारात एमआयची नक्कल करून विक्री होणाऱ्या उत्पादनांचा मोठा साठा असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर स.पो.नी.एस. जी. मिसळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंचांसह छापा टाकला यात ही जम्बो कारवाई करण्यात आली आहे.
१) चामुंडा मोबाईल शॉपी – निवाराम देवासे
* कव्हर, फ्लिप कव्हर, ग्लास, वायर
* किंमत : २,९२,२५२ रुपये
२) महादेव मोबाईल शॉपी – गोपाल देवाशी
* कव्हर, फ्लिप कव्हर, ग्लास
* किंमत : ३,०५,६२० रुपये
३) रामदेव मोबाईल शॉपी – रमेशकुमार चौधरी
* कव्हर, बॅक पॅनल, चार्जर
* किंमत : १,८२,९४४ रुपये
४) माताजी मोबाईल शॉपी – नकुलसिंग राठोड
* कव्हर, डिस्प्ले, बॅक पॅनल, चार्जर, ग्लास, पोको पॅनल
* किंमत : ५,६९,९९९ रुपये
लक्ष्मी मोबाईल शॉपी आणि शिरीष मोबाईल शॉपी ही दोन दुकाने छाप्यावेळी बंद आढळली.
तपासात उघड झाले की, या दुकानांत विक्रीस ठेवलेल्या वस्तूंमध्ये एमआय कंपनीच्या लोगोची नक्कल, ट्रेडमार्कची प्रतिकृती आणि समान रंगसंगती यांचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे कंपनीच्या कॉपीराईट आणि मालकी हक्कांचे गंभीर उल्लंघन झाल्याने आरोपींवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
ग्राहकांना सावध राहण्याचे आव्हान बनावट चार्जर, डिस्प्ले आणि इतर निकृष्ट दर्जाच्या उपकरणांमुळे मोबाईलचे नुकसान होऊ शकते, असे पोलिसांनी सांगितले. अधिकृत विक्रेत्यांकडूनच मूळ उत्पादने खरेदी करावीत, असे आव्हान यावेळी करण्यात आले.