

Vaijapur coffee shop raid
वैजापूर : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसण्यासाठी तास न् तास जागा उपलब्ध करुन देणाऱ्या येवला रोडवरील आय लव कॉफी सेंटरवर वैजापूर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. ६ तरुण व ३ तरुणींना ताब्यात घेऊन त्यांना समज देऊन पालकांच्या स्वाधीन केले. कॅफे चालकाला नोटीस बजाविण्यात आली आहे.
शहरात महाविद्यालयासोबतच विविध शिकवणीचे वर्ग आहेत. यामुळे तालुक्यातील विविध भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात. तरुण-तरुणींची संख्या वाढल्याने शहरात कॅफे देखील आहे. मात्र, यापैकी अनेक कॅफेमध्ये कॅफेचालक प्रायव्हसीच्या नावाखाली स्वतंत्र व्यवस्था करून देतात. यासाठी २०० ते ५०० रुपयांपर्यंत प्रती तास पैसे उकळले जातात. शॉपमध्ये स्वतंत्र कक्ष उपलब्ध असल्याने महाविद्यालयीन तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यातून वाढणारे गैर प्रकार लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणी कॅफे चालकावर कारवाई करून त्यास नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच स्वतंत्र कक्ष बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे, भुरे, नरवडे, पोलीस अंमलदार, कुऱ्हाडे, नाचन यांच्या पथकाने केली.
शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या मुलांकडे पालकांनी लक्ष द्यावे. तसेच त्यांच्या नियमित संपर्कात राहून विचारपूस केली पाहिजे, शहरातील सर्व कॅफे चालकांचे स्वतंत्र कक्ष बंद करण्यात येणार आहेत. सर्वांना पहिल्यांदा तशी नोटीस बजावण्यात आली आहे. भविष्यात कॅफेमध्ये पुन्हा गैरप्रकार झाल्याचे आढळून आल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येईल.
- पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, वैजापूर पोलीस ठाणे