

शिऊर :अज्ञात वाहनाने समोरून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.२४) सायंकाळी ७.१५ च्या सुमारास शिवगाव पाटीजवळ घडली. काळू रामू जाधव (२८, रा.करोडी) असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, काळू जाधव हा (एम एच २१ बी आर ५२९६) या क्रमांकाच्या दूचाकीवरून शिऊर बंगल्याकडून सोमवारी सायंकाळी तो त्याच्या गावाकडे (करोडी) जात असताना वैजापूर तालुक्यातील शिवगाव पाटी नजीक अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की,काळू रस्त्यावर फेकला जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब,पोलीस नाईक गणेश गोरक्ष,संभाजी आंधळे यांनी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी छ. संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठवला आहे दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची नोंद शिऊर पेालिस ठाण्यात करण्याची कार्यवाही सुरु होती.