
वैजापूर : अस्थीविसर्जनासाठी नाशिक येथे जात असताना भारधाव आयशरने कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सासऱ्यासह जावयाचा मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले. जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी (दि.११) वैजापूरजवळील समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास घडली.
रामचंद चंदुमल मेठानी (५५, रा. रामपुरी केम झुलेलाल लाईन नियर काकीमों आश्रम, अमरावती) व नामदेव ढालुम पोपटाणी (३८,रा. जुनासिंधी कॉलनी, नंदुरबार) असे अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. तर रमण टेकवानी व दीपक मेठानी हे दोघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद मेठानी हे अमरावती येथील रहिवासी असून १२ दिवसांपूर्वी त्यांच्या भावजयीचे निधन झाले. यामुळे रामचंद त्यांचे जावई नामदेव, पुतणे रमण व दीपक यांच्यासोबत एका कारने नाशिक येथे अस्थीविसर्जनाच्या कार्यक्रमासाठी जात होते. दरम्यान सोमवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांची कार समृद्धी महामार्गाच्या चॅनल क्रमांक ४९० जवळ पोहचली. यावेळी समोरून येणाऱ्या भरधाव आयशरने (डीडी-०१-एन-९२७५) ने त्यांच्या कारला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, रामचंद व नामदेव हे जागीच ठार झाले. त्यांचे पुतणे गंभीर जखमी झाले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रामचंद व नामदेव यांना तपासून मृत घोषित केले. त्यांच्या पुतण्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. याप्रकरणी रामचंद यांचा मुलगा जयकुमार मेठानी याने दिलेल्या फिर्यादीवरून आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे करत आहेत.