

वैजापूर: तालुक्यातील नांदूरढोक गावाजवळ भरधाव वेगात येणाऱ्या हायवाने तरुणाला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात जालिंदर एकनाथ गायधने (वय ३९) यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी हायवा पेटवून दिला, त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, मातीने भरलेला सदरील हायवा बाबुळगावगंगा वरून नांदूर ढोक दिशेने हायवा अतिवेगाने जात असताना दुचाकीवरून जात असलेल्या जालिंदर गायधने यांना धडक बसली. धडक इतकी भीषण होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती पसरताच नांदूर ढोकसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांचा उद्रेक झाला आणि त्यांनी हायवाला आग लावली.
घटनेची माहिती मिळताच वीरगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आगीमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रकरणी पोलिसांकडून पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाकडून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नेहमीच्या त्रासामुळे नागरिक त्रस्त..
परिसरात अवजड वाहनांची दहशत रोजचीच झाली आहे. वेगमर्यादा कागदावर, नियंत्रण शून्य आणि प्रशासन मुकदर्शक,अपघात होतो, बळी जातो आणि मग चौकशीचा फार्स सुरू होतो. वेळेवर कारवाई झाली असती तर आज जालिंदर गायधने यांचा जीव गेला नसता, असा थेट सवाल संतप्त नागरिक करत आहेत.