

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाने जिल्ह्यात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी मतदारसंघानिहाय बीएलओ नियुक्त केले आहेत. त्यासर्वांनी डोअर टू डोअर जाऊन मतदार पडताळणी करणे आवश्यक आहे. मात्र शहरातील ११५ वॉर्डासाठी नियुक्त केलेले १२०० बीएलओ नगरसेवक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या घरी व कार्यालयांमध्ये बसूनच याद्यांचे पुनरीक्षण करीत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे बहुतांश वसाहतींतील मतदार अजूनही एसआयआरपासून वंचित आहेत.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाने देशभरात सध्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातही हा कार्यक्रम सुरू असून, त्यासाठी जिल्हा प्रशासनाने बीएलओ नियुक्त केले आहेत.
शहरातील पूर्व, पश्चिम, मध्य या तीन मतदार संघासोबतच फुलंब्रीतील काही भाग अशा सुमारे ११५ वॉर्डातील सुमारे १५ लाख मतदारांसाठी प्रशासनाने १२०० बीएलओ नियुक्त केले आहेत. या बीएलओंनी शासन आदेशाप्रमाणे प्रत्येक वसाहतीमध्ये डोअर टू डोअर फिरणे आणि मतदारांचे कागदपत्रे तपासून मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण करणे बंधनकारक आहे. तसे आदेशही जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी प्रत्येक बीएलओला दिले आहेत.
शहरात प्रत्यक्षात मतदार याद्यांचा वेगळाच कार्यक्रम सुरू आहे. बीएलओ वॉर्डामध्ये दाखल होताच, त्यांना नगरसेवक अथवा राजकीय पक्षांचे पदाधिकारी हायजॅक करीत आहेत. तर काही भागांत बीएलओ हे स्वतःच नगरसेवकांचा शोध घेऊन त्यांच्या कार्यालयात बसूनच मतदार याद्यांचे पुनरीक्षण करीत आहेत.
जवळपास ७० ते ८० टक्के बीएलओंकडून एसआयआरचे काम अशाच प्रकारे सुरू आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या मर्जीतील मतदारांचेच पुनरीक्षण होत आहेत. बहुतांश वसाहतींमध्ये अजूनही मतदारांना आपल्या भागात, असा कार्यक्रम सुरू असल्याबाबत माहितीही नाही. मतदार बीएलओंचीच प्रतीक्षा आहे. त्यात आता ८ आगस्ट रोजी या कार्यक्रमाची शेवटची तारीख दिली आहे. त्यामुळे वंचित राहणाऱ्यांचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
बीएलओकडे प्रत्येकी १२०० मतदार
शहरात सुमारे १५ लाखांहून अधिक मतदार आहेत. त्यामुळे १२०० बीएलओ नियुक्त केले असून, त्या सर्वांकडे प्रत्येकी १२०० ते १५०० मतदारांच्या पुनरीक्षणाचे काम देण्यात आले आहेत.
किमान ३ तास फिरणे बंधनकारक- शहरात नियुक्त केलेल्या प्रत्येक बीएलओला वसाहतनिहाय कामाचे वाटप केले आहे. या बीएलओंनी दिलेल्या वसाहतींमध्ये दररोज किमान ३ तास डोअर टू डोअर फिरणे बंधनकारक आहे. त्यानंतर वसाहतीतील मतदान केंद्राच्या परिसरात बसून याद्यांचे पुनरीक्षण करावे, अशी सूचना दिली आहे.
सविता चौधर, निवडणूक, उपजिल्हाधिकारी