

सिल्लोड : गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाने सिल्लोड शहरालगतच्या आव्हाना रोड परिसरात धडक कारवाई करत अवैधरित्या साठवून ठेवलेले सागवान प्रजातीचे सुमारे आठ टन लाकूड जप्त केले. या कारवाईत अंदाजे २ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून संबंधित व्यक्तीविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास वनविभागाच्या पथकाने आव्हाना रोड परिसरात छापा टाकला. तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात सागवान लाकडाचा साठा आढळून आला. प्राथमिक चौकशीत हा साठा सत्तार खान इस्माईल खान यांचा असल्याचे समोर आल्यानंतर वनविभागाने तातडीने जप्तीची कारवाई केली.
जप्त करण्यात आलेले सागवान लाकूड आयशर वाहनाच्या सहाय्याने शासकीय डेपोमध्ये सुरक्षित जमा करण्यात आले असून पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई मुख्य वनसंरक्षक प्रमोद चंद लाकरा, उपवनसंरक्षक सुवर्णा माने, सहाय्यक वनसंरक्षक स्वप्नील भामरे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यशपाल दिलपाक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत वनपाल रेखा बरबडे, वनरक्षक साईनाथ पवार, गणेश परदेशी, अजीम शेख, विशाल जाधव, अनिल इंगळे तसेच वाहन चालक विलास नरवाडे यांनी सहभाग घेतला.
कारवाईदरम्यान सिल्लोड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कोठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल आनंद पगारे व भूषण चौधरी यांनीही सहकार्य केले.वनविभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध वृक्षतोड व लाकूड साठवणूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.