

छत्रपती संभाजीनगर : युद्धामुळे निर्माण झालेली गॅस टंचाई आणि त्यामुळे फोफावलेला सिलिंडरचा काळाबाजार रोखण्याची मागणी करत शिवसेना उबाठा पक्षाने - शुक्रवारी (दि.२७) सकाळी ११ वाजता शहरातील २३ गॅस एजन्सींसमोर एकाचवेळी आंदोलन केले. जिल्हा प्रशासन आणि एजन्सींनी हा काळाबाजार रोखावा आणि नागरिकांची होणारी हेळसांड व आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशी मागणीही आंदोलनाव्दारे करण्यात आली.
आखाती देशात भडकलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. घरगुती गॅसचा पुरवठाही विस्कळीत होऊन या टंचाईत ग्राहक होरपळला जात आहे. तर टंचाईच्या आड सिलिंडरचा काळाबाजारही सुरु आहे. या विरोधात शुक्रवारी उबाठा सेनेकडून आंदोलन करण्यात आले. सिडको भागात मंगेश गॅस एजन्सी येथे शिवसेना नेते व माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात वीरभद्र गादगे, दिग्विजय शेरखाने, सुरेश कर्डिले, सीमा गवळी, विजया पवार यांनी आंदोलन केले.
गॅस टंचाईविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर एजन्सीचे मालक मंगेश अस्वार यांना निवेदन दिले. याबाबत अंबादास दानवे म्हणाले, शहरात सध्या गॅस टंचाईमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहे. घरगुती वापरासाठी लागणारा गॅस मिळवताना नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. तर दुसरीकडे काही दलालांकडून सर्रास काळाबाजार सुरू असून १५०० पासून ३ हजार रुपयांपर्यंत घरगुती गॅस विकला जातोय. हे प्रकार थांबवून ग्राहकांना घरपोच वेळेत सिलिंडर द्यावा, अशी मागणी एजन्सी व जिल्हा प्रशासनाकडे केली. असेही ते म्हणाले.
अॅडव्हान्स बुकिंगने वेटींग लिस्ट
ऑनलाइन बुकिंगनंतरच सिलिंडर मिळतो. सध्या साठा पुरेसा आहे. पूर्वीप्रमाणेच एजन्सींना रोजचा पुरवठा होतोय. मात्र, युद्धामुळे पसरलेल्या अफवेतून लोकांनी पॅनिक होत अॅडव्हान्स बुकिंग केले. त्यामुळे वेटींग यादी वाढत असल्याचेही एजन्सींचालक म्हणाले.