

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील दहा वाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. या वाळू घाटांमधून संबंधित ठेकेदारांना पुढील वर्षभर वाळू उपसा करता येणार आहे. या घाटांचा लिलाव येत्या २० नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे अधिकृत वाळू विक्री सुरू होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात एकही वाळूघाट सुरू नाही. त्यामुळे अनधिकृत पद्धतीने तसेच इतर जिल्ह्यांतून शहरात वाळू आणून विकली जात आहे. परिणामी वाळूचे भाव अवाक्याबाहेर गेले आहेत तीन वर्षांपूर्वी राज्य सरकारने वाळूघाटांच्या लिलावाऐवजी वाळू डेपोचे धोरण राबविले.
त्यात वाळूघाटातून उपसा करून तो डेपोत साठविण्याचे काम खासगी एजन्सींकडून करून घेण्यात आले. त्यानंतर स्वतः शासनाकडून चलन भरून वाळूची विक्री करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी वाळू डेपो कार्यान्वित करण्यात आले. मुदत संपल्याने हे डेपो बंद पडले. राज्य सरकारने वाळू धोरणात बदल करून पुन्हा जुनीच वाळू घाटांच्या लिलावाची पद्धत स्वीकारली आहे. वाळूघाटांचा लिलाव करून ठेकेदारांना त्यातील वाळू विक्री करण्याची मुभा दिली गेली आहे