

छत्रपती संभाजीनगर : प्रतापनगरसारख्या उच्चभ्रू वस्तीत एका व्यापाऱ्याच्या घरात घुसून साडेचार लाखांचा ऐवज लुटल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेच्या तपासासाठी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशाने गुन्हे शाखेसह परिमंडळ २ चे उपायुक्त रत्नाकर नवले यांनी विशेष पथके स्थापन करून दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे. गुन्हे शाखेसह तब्बल पाच पथके दरोडेखोरांच्या मागावर असून, काही पथके परराज्यात रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र घटनेच्या दुसऱ्यादिवशीही पोलिसांच्या हातात ठोस असे धागेदोरे लागलेले नव्हते.
सशस्त्र दरोडेखोरांच्या या टोळीने सोमवारी (दि. ६) पहाटे ३ वाजेच्या सुमारास प्रतापनगरमध्ये तब्बल ४० मिनिटे धुमाकूळ घातला होता. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. गुन्हे शाखेची तीन, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचे एक आणि परिमंडळ स्तरावरील एक अशी एकूण पाच पथके सध्या दरोडेखोरांचा कसून शोध घेत आहेत. गुन्हे शाखेचे उपायुक्त शशिकांत सातव, पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर तपासावर लक्ष ठेवून आहेत.
व्यापारी संजय लाहोटी यांच्या घरात घुसलेल्या टोळीतील दरोडेखोर आपापसांत तेलगू आणि मोडक्या मराठीत संवाद साधत होते. या भाषेवरून हे दरोडेखोर राज्यालगतच्या सीमाभागातील असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. याच धाग्यावरून तपासाची दिशा निश्चित करत पोलिसांची विशेष पथके तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांच्या सीमाभागात रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू
दरोडेखोरांनी गुन्ह्यासाठी रेल्वेचा वापर केल्याचा संशय असल्याने आणि त्यांनी घरातून रेल्वे रुळाच्या दिशेनेच पलायन केल्याने पोलिसांनी प्रतापनगर परिसरासह रेल्वेस्टेशन आणि शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी या सीसीटीव्ही फुटेजसह मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासावर सध्या पोलिसांकडून सर्वाधिक भर दिला जात आहे. दरोडेखोरांच्या देहबोलीवरून त्यांचा माग काढणे सुरू आहे.