

कन्नड : तालुक्यातील ८ जिल्हा परिषद व १६ पंचायत समिती सदस्यांच्या निवडीसाठी भाजप–शिवसेना युतीत भाजप ४ व शिवसेना ४ असा फॉर्म्युला ठरवून वरिष्ठ नेत्यांनी युती जाहीर केली होती. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी, अंतिम क्षणी भाजपाने चिंचोली लिंबाजी गटातील उमेदवाराला ‘बी’ फॉर्म जोडल्याने शिवसेना–भाजपा युती काही प्रमाणात संकटात सापडली. दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडला.
चिंचोली लिंबाजी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेतून भाजपात गेलेले माजी जिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मात्र युतीच्या वाटाघाटीत हा गट शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने राजपूत यांची कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षश्रेष्ठीकडे आपले राजकीय वजन वापरत अंतिम टप्प्यात आपल्या उमेदवारी अर्जास भाजपचा ‘बी’ फॉर्म जोडला. हा प्रकार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात येताच काही मिनिटांतच शिवसेनेने जेहूर, देवगाव रंगारी व हतनूर या गटांतील उमेदवारांना ‘बी’ फॉर्म जोडले. परिणामी भाजप–शिवसेना युतीला मोठा धक्का बसला.
दरम्यान, “वरिष्ठ नेतृत्वाने युतीतील गटांचे वाटप स्पष्ट केले असताना, शिवसेनेच्या वाट्याला गेलेल्या चिंचोली लिंबाजी गटातून भाजपाने ‘बी’ फॉर्म देण्याची गरज नव्हती,” अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या एका जबाबदार नेत्याने व्यक्त केली. ‘बी’ फॉर्म जोडण्यावरून जरी भाजप शिवसेना युती मध्ये तणाव निर्माण झाला असला तरी मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तडजोड होवून युती अबाधित ठेवण्याचं प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून होऊ शकतो अशा प्रतिक्रिया काही कार्यकर्त्यांनी दिल्या आहे.
भाजप - शिवसेना युतीची घोषणा झाल्यावर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते मध्ये आनंदाचे वातावरणात निर्माण झाले होते. तर अनेक इच्छुकांनी निवडणुकीसाठी गेल्या तीन ते चार वर्षापासून तयारी केली होती. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आपली उमेदवारी कटली हे कळताच नाराज इच्छुकानी तात्काळ पक्षनिष्ठा वाऱ्यावर सोडून कांग्रेस, उबाठा, या पक्षाची उमेदवारी घेतली. यामुळे या पक्षाना सुद्धा बळ मिळण्याची चिन्ह आहे.