

कन्नड : तालुक्यातील जामडी फॉरेस्ट शिवारात घडलेल्या खुनाच्या क्लिष्ट गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा व ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या प्रकरणात आई-मुलाने मिळून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
१३ जानेवारी रोजी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जामडी फॉरेस्ट गावालगतच्या वनभागात एक अनोळखी प्रेत आढळून आले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पाहणीत सदर मृतदेहाची ओळख जामडी गावातील नागरिकांनी पटवून दिली. मृताचे नाव राजू रामचंद्र पवार (रा. जामडी, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) असे निष्पन्न झाले.
मयताचा नातेवाईक प्रकाश रामचंद्र पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ०८/२०२६, कलम १०३(१), २३८ BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड व अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी घटनास्थळी भेट देत तपासासाठी तातडीच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके व कन्नड ग्रामीण सपोनि रामचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस एक पथक तपासात उतरले.
तपासादरम्यान घटनास्थळाच्या आसपास झाडाझुडपे, नाले व शेतात बारकाईने शोध घेतला असता मृताच्या अंगावरील अंडरपॅंट, फुटलेला मोबाईल व चप्पल काही अंतरावर वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले. त्यामुळे तपासाची दिशा अधिक गहिरी झाली. १३ ते २० जानेवारी या कालावधीत तब्बल आठ दिवस तपास करत ५० हून अधिक संशयितांची चौकशी करण्यात आली. मात्र ठोस माहिती मिळत नव्हती. अखेर मयत हा बंजारा समाजातील असल्याने त्या समाजाची भाषा जाणणाऱ्या गोपनीय बातमीदारांच्या मदतीने माहिती गोळा करण्यात आली.
घटनास्थळालगतचे शेत राजू जोधा पवार यांचे असून, ते शासकीय सेवेत असल्याने शेती पत्नी वंदना पवार व मुलगा धीरज उर्फ टेमा कसत असल्याची माहिती मिळाली. चौकशीत वंदना पवार संशयास्पदरीत्या माहिती लपवत असल्याचे निदर्शनास आले. सखोल चौकशीनंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. वंदना पवार हिने सांगितले की, मयत राजू पवार तिच्याकडे वारंवार शारीरिक संबंधाची मागणी करत होता. या त्रासाला कंटाळून तिने मुलगा धीरज याच्यासह खुनाचा कट रचला. १३ जानेवारी रोजी सकाळी तिने राजू पवार याला शेताकडे बोलावले. झाडीत आल्यानंतर मुलाने त्याच्या डोक्यात मारले व वंदनाने त्याचे गुप्तांग दाबून त्याचा खून केला. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह वनभागातील नाल्यात झाडाच्या मुळाखाली लपवून ठेवला. दिशाभूल करण्यासाठी अंडरपॅंट, चप्पल व मोबाईल वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.
तपासात आणखी धक्कादायक बाब समोर आली की, आरोपी मुलगा धीरज उर्फ टेमा याने क्राइम पेट्रोल, सीआयडी व ‘दृश्यम’ चित्रपट पाहून संपूर्ण कटाची आखणी केली होती. या प्रकरणात आरोपी वंदना राजू पवार (वय ४५) व तिचा मुलगा धीरज उर्फ टेमा राजू पवार (वय १८, रा. जामडी फॉरेस्ट) यांना अटक करण्यात आली असून, दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपास कन्नड ग्रामीण पोलीस ठाणे करत आहे.
या गुन्ह्याचा यशस्वी तपास पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, सहायक पोलीस अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत तसेच स्थानिक गुन्हे शाखा व कन्नड ग्रामीण सपोनि रामचंद्र पवार, आदी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडला. आठ दिवस अखंड तपास, गोपनीय बातमीदारांचा वापर व तांत्रिक माहितीच्या आधारे हा अत्यंत कठीण व गुंतागुंतीचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.