

छत्रपती संभाजीनगर : संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासह सभापती, उपसभापती यांचे एक महिन्याचे मानधन यासह एका सभेचा भत्ता व कर्मचार्यांकडून दोन दिवसांचे वेतन देण्याचा निर्णय शनिवारी (दि.२७) पार पडलेल्या वार्षकि सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. सभापती राधाकिसन पठाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या सभेत किरकोळ वादविवाद वगळता खेळीमेळीचे वातावरण पार पडली.
कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षकि सर्वसभा शनिवारी सभापती राधाकिसन पठाडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पुरग्रस्तांसाठी संचालक मंडळासह सभापती, उपसभापती यांचे एक महिन्याचे मानधन व एका सभेचा भत्ता आणि कर्मचार्यांकडून दोन दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा ठराव घेण्यात आला. या सभेत प्रोसिडिंगमध्ये मुद्दे नोंदवले जात नसल्याचा आरोप संचालक जगन्नाथ काळे यांनी केला. सभेच्या सुरुवातीला विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, मोकाट जनावरे व मालमत्ता कराच्या मुद्द्द्यावर विरोधकांनी प्रशासनाला प्रश्न विचारले. संचालक नानासाहेब पळसकर यांनी, गेल्या दोन वर्षींपासून मोकाट जनावरांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, तरी कारवाई होत नाही, अशी खंत व्यक्त केली. तसेच शहराचे नामांतर झाल्यानंतरही व्यापारी दुकानांवर औरंगाबाद असे नाव वापरत असल्याची तक्रार करून, परवाने रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. यावर सभापती पठाडे म्हणाले की, सर्व मोकाट जनावरे ही अतिक्रमणधारकांची असून, शिव-सेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अतिक्रमण हटवू नये, असे पत्र दिल्याचा आरोप केला. सात दिवसांत दुकानांवर छत्रपती संभाजीनगर नावे लिहावीत, अन्यथा परवाने रद्द केले जातील, अशी कठोर सूचना पठाडे यांनी दिली. यावेळी स्वच्छतेबाबतच्या तक्रारींवर लवकरच नवीन टेंडर काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ठेकेदाराला वेळेपूर्वीच दिलेले पैसे संबंधित जबाबदारांकडून वसूल करण्याचा निर्णयही त्यांनी यावेळी जाहीर केला असून बाजार समितीने केलेल्या विकासकामांची माहिती देण्यात आली.
यंदा २४ कोटी ६९ लाख रुपयांची विकासकामे
बाजार समितीकडून उपबाजारपेठ, वसतिगृह, स्वच्छतागृहे, सोलार सिस्टीम, धान्य चाळणी यंत्र शेड, कार्यालयीन इमारती आदींसाठी कोट्यवधींची कामे पूर्णत्वास येत असल्याचे सांगण्यात आले. तर गतवर्षी २८ कोटी ६४ लाख रुपये खर्चुन झालेली विकासकामे अंतिम टप्प्यात असून, आगामी काळात २४ कोटी ६९ लाख रुपयांची कामे हाती घेण्यात येणार असल्याचेही सभापती पठाडे यांनी सांगितले.