

छत्रपती संभाजीनगर : शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील नाल्यांना पूर आला होता. पात्राबाहेर आलेले पाणी थेट नागरी वसाहतीतील अनेक घरांमध्ये शिरले होते. काही भागांत पाच फुटांहून अधिक पाणी साचले होते. भविष्यातील बिकट संकटाचे हे संकेत असल्याने आता शहरातील सर्व ९८ नाल्यांतील अतिक्रमण काढून नैसर्गिक प्रवाह मोकळा केला जाणार आहे. त्यासंदर्भातील आदेश सर्व झोन अधिकारी आणि अतिक्रमण हटाव विभागाला देण्यात आल्याचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले.
सध्या थोडा पाऊस झाला की शहराच्या विविध भागांत पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. यात प्रमुख्याने सातारा-देवळाई आणि राहुलनगर, मयूरबन कॉलनी, शहानुरमिया दर्गा परिसर, कैलासनगर, दादा कॉलनी, हिलाल-जलाल कॉलनी परिसर यासह शेकडो वसाहतींचा समावेश आहे. या सर्व वसाहतींमधून नाले जात असून, या नाल्यांवर अनेक ठिकाणी नागरिकांनी अतिक्रमणे केली आहेत.
काहींनी तर थेट नाल्याचा नैसर्गिक प्रवाहच बंद करून त्याठिकाणी घरे बांधली आहेत. काही वसाहतींमध्ये तर टोलेजंग इमारतीच बुजविलेल्या नाल्यांमध्ये उभ्या आहेत. हा सर्व प्रकार दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर प्रशासक जी. श्रीकांत यांना दिसून आला. त्यांनी ज्या ज्या वसाहतींमध्ये पाणी साचले होते, तेथील प्रत्यक्ष स्थितीची पाहणी केली. यात जवळपास सर्वच ठिकाणी नाल्यांवरील अतिक्रमणाचाच मुद्दा पुढे आला. अखेर मंगळवारी (दि.30 सप्टेंबर) प्रशासकांनी सर्व १० झोन कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्त आणि अतिक्रमण हटाव विभागाला नाले अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश दिले.
११८ कि.मी. अंतराचे नाले
संपूर्ण शहरात एकूण ९८ नाले आहेत. त्यांची लांबी ही ११८ किलोमीटर एवढी आहे. जवळपास यासर्वच नाल्यांमध्ये ठिकठिकाणी अतिक्रमण झाले आहे. या नाल्यांची लवकरच तपासणी करण्यात येणार आहे. ज्या ज्या नाल्यांवर अतिक्रमण आहे, त्या ठिकाणी रस्त्याप्रमाणेच धडक मोहीम राबविण्यात येणार असल्याचे प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले.
नगरभूमापनकडून सर्वेक्षण
शहरातील प्रमुख नाल्यांची लांबी, रुंदी नेमकी किती आहे, याबाबत भूमिअभिलेख विभागाकडून महापालिकने २० वर्षांपूर्वी सर्वेक्षण करून घेतले. त्यानंतर अहवालानुसार महापालिकेने शहरातील विविध नाल्यांतील अतिक्रमणांवर कारवाई करीत नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह मोकळा केला होता. परंतु पुन्हा या नाल्यांवर अतिक्रमण झाले आहेत.
सातारा-देवळाईतील नाले दाबले
शहरातील नाल्यांपेक्षा सातारा-देवळाईतील नाल्यांची बिकट परिस्थिती आहे. येथील जवळपास सर्वच नाले दाबवण्यात आल्याने पावसाचे पाणी सतत साचण्याची घटना घडत आहे.