

छत्रपती संभाजीनगर : घरात मैत्रिणीसोबत दारूची पार्टी केल्यानंतर बाहेर जाताच घरी आलेल्या मित्राला मैत्रिणीसोबत आक्षेपार्य अवस्थेत पाहताच डोक्यात दांड्याने घाव घालून मित्राची निर्घुण हत्या केली. ही घटना सोमवारी (दि.३) रात्री अकराच्या सुमारास काबरानगरात घडली. एका साथीदाराला बोलावून घेत मृतदेह घरापासून २० फूट अंतरावर नाल्याजवळ फेकला. काही वेळाने अपघात म्हणून मृतदेह नागरिकांनी घाटीत नेला. मात्र पोलिसांनी सकाळी घटनास्थळी सीसीटीव्ही तपासून खुनाचा उलगडा करत आरोपी सुधाकर शेषराव ढेपे (४८, रा. कावरानगर) याला बेड्या ठोकल्या. त्याची मैत्रीण व एक अल्पवयीन पसार झाले आहेत. विशाल बंडू पाचकोर (३२, रा. काबरानगर) असे मृताचे नाव असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ढेपे हा पेंटिंगचे काम करतो, तर मृत विशाल पाचकोर हा मजूर होता. दोघेही चांगले मित्र होते. सोमवारी ( दि.3 ) रात्री ढेपेने त्याच्या ४५ वर्षीय मैत्रिणीला घरी बोलावून दारूची पार्टी केली. तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर काही वेळाने त्यांचा मित्र विशाल बंडू पाचकोर (३२) हा घरी आला. गप्पा मारल्यानंतर सुधाकर कामानिमित्त बाहेर गेला. काम आटोपून घरी येताच त्याला आपली मैत्रीण आणि मित्र विशाल पाचकोर हे आक्षेपार्ह अवस्थेत दिसले. हे दृश्य बघताच संतापलेल्या सुधाकरने विशालला बेडवरून खाली खेचले आणि लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. डोक्यात घाव घालून त्याची हत्या केली. जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या विशाल पाचकोरला पाहून एका नागरिकाने तातडीने रुग्णवाहिकेला फोन केला आणि त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
आरोपीने घरातील रक्त केले साफ
आरोपी सुधाकर आणि त्याच्या मैत्रिणीने घरातील सर्व रक्त साफ केले. मैत्रीण रात्रीच तेथून पसार झाली. सुधाकर घरात निवांत झोपला. सकाळी पोलिस सुधाकरच्या घरी गेले तेव्हा तो निवांत बसलेला होता. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजवरून गुन्हा उघड
मृताच्या शरीरावर मारहाणीच्या गंभीर जखमा असल्याने जवाहरनगर पोलिसांना संशय आला. पोलिस निरीक्षक सचिन कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तेव्हा त्यांना फुटेजमध्ये दोन व्यक्ती मृतदेह ओढून नेत रस्त्यावर टाकून देताना कैद झाले आणि खुनाचा उलगडा झाला.