

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेने शहरातील रस्ते विकास आराखड्यानुसार रुंद करण्यावर भर दिला आहे. यात आतापर्यंत मुख्य रहिदारीच्या रस्त्यांवरच मार्किंग करून पाडापाडी करण्यात आली. परंतु आता अंतर्गत मुख्य रस्त्यांचीही यादी प्रशासनाने तयार केली आहे. यात सेव्हनहिल ते शहानुरवाडी दर्गा पुढे भाजीवाली बाई ते आनंद गाढे चौक रस्त्याचा समावेश आहे. त्यासोबतच मोंढा नाका उड्डाणपूल ते लक्ष्मणचावडी पुढे जुना मोंढा या ३० मीटर रुंदीच्या रस्त्यासह इतर चार रस्त्यांचा समावेश आहे. त्यासाठी लवकरच अनाऊन्समेंट करण्यात येणार आहे.
शहरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने आता रस्त्यांच्या रुंदीकरणावर भर दिला आहे. त्यासाठी शहर विकास आराखड्यात रस्त्यांच्या मंजूर रुंदीनुसार प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात प्रशासनाने शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेला जुना मुंबई मार्ग, पैठण रोड, बीड बायपास रोड, जळगाव रोड, जालना रोड या पाच रस्त्यांवर रुंदीकरणाआड येणारी बेकायदा बांधकामे जमीनदोस्त केली. यानंतर प्रशासनाने शहराअंतर्गत असलेल्या प्रमुख रस्त्यांना प्राधान्य देण्याचा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला आहे. त्यानुसार सध्या जुन्या व नव्या शहर विकास आराखड्यात मंजूर असलेल्या रस्त्यांवर अनाऊन्समेंट, कागदपत्रे तपासणी, मार्किंग करण्यात येत आहे.
महापालिकेने मागील दीड महिन्यात राबविलेल्या पाडापाडीच्या मोहिमेमुळे आता नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. महापालिकेच्या पथकाने साधी अनाऊन्समेंट जरी केली. तरी त्या रस्त्यालगतचे मालमत्ताधारक स्वतःच मोजणी करून आपली बांधकामे मागे सरकवण्यास सुरुवात करीत आहे. चंपाचौक ते जालना रोड या मार्गावर महापालिका व नगरभूमापन विभागाद्वारे संयुक्त मोजणी करण्याचे नियोजन गेल्या आठवड्यात करण्यात आले होते.
त्यासाठी पथक चपाचौक येथे गेले होते. याबाबत मालमत्ताधारकांना माहिती झाल्यानंतर चंपा चौक ते जिन्सीपर्यंत त्यापुढे असलेल्या मालमत्ताधारकांनी स्वतःहून बांधकाम काढणे सुरू केले होते. बाबा पंप ते मिल कॉर्नर रस्त्यावरही तीच परिस्थिती आहे.
शहरातील काही संघटनांकडून विरोध होत आहे. परंतु त्यामुळे शहराचा अनेक वर्षांपासून रखडलेल्या विकासाला ब्रेक देणार नाही. रस्ते रुंद झाले तरच शहराचा विकास होईल. मोठी उद्योग शहरात गुंतवणुकीसाठी येतील. त्यामुळे आता प्रशासन थांबणार नसल्याचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले.