

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेची निवडणूक युतीमध्येच लढण्याचे आदेश प्रदेशाच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजप-शिव-सेनेच्या स्थानिकांना दिले आहेत. त्यामुळे आज गुरुवारी (दि.२५) युतीसाठी शेवटची निर्णायक बैठक होणार असून, वरिष्ठांच्या आदेशानंतर आता दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जागांच्या तडजोडीची (ॲडजेस्टमेंट) तयारीही दर्शविली आहे.
दोन आठवड्यांत दोन्ही पक्षांच्या चारवेळा बैठका झाल्या, परंतु चारही वेळा जागांच्या रस्सीखेचवरून दोन्ही पक्षांत एकमत होऊ शकले नाही. शहरात यंदा भाजपकडे सर्वच प्रभागांत एका एका जागेसाठी किमान ९ ते १२ इच्छुक आहेत. त्यात निवडून येण्याची क्षमता असलेल्यांची संख्या ही ३ ते ४ आहे. त्यामुळे गेल्यावेळीपेक्षा जास्तीच्या जागा देण्यात याव्यात, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. परंतु त्यास शिंदेसेनेने सपशेल नकार दिला आहे.
प्रत्येकालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करायची इच्छा आहे. त्यामुळेच राज्यभरात - भाजपकडे इच्छुकांची गर्दी अधिक प्रमाणात आहे. परंतु महापालिका निवडणूक युतीमध्येच लढायची, हेही तेवढेच निश्चित असल्याने आज युतीसाठी निर्णायक बैठक होणार आहे. त्यात तडजोड करून निर्णय घेणार आहोत.
अतुल सावे, ओवीसी कल्याण मंत्री, भाजप
दरम्यान, चौथ्या बैठकीत सेनेकडून भाजपला फिफ्टी फिफ्टीचा फार्म्युला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यावरही काही जागांवरून मतभेत कायम राहिले. त्यात मंगळवारी एका प्रवेश सोहळ्यासाठी भाजपचे जिल्हा निवडणूक प्रभारी तथा ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे आणि खासदार डॉ. भागवत कराड, आमदार संजय केणेकर, शहराध्यक्ष किशोर शित-ोळे, माजी शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, निवडणूक प्रमुख समीर राजूरकर हे पदाधिकारी मुंबईत गेले होते. कार्यक्रमानंतर त्यांना वरिष्ठ नेत्यांनी युतीबाबत निर्णय घेण्याची सूचना केली आहे. त्यानुसार आता ॲडजेस्टमेंट करून अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.