Sambhajinagar Rain Deficit | बाप्पाच्या आगमनानंतरही पावसाने पाठ फिरवली; सप्टेंबरमध्ये उन्हाचे चटके

पावसाची हुलकावणी; मका, कापूस, तूर, ऊस पिके संकटात, बळीराजा चिंतेत
September Heatwave Maharashtra
September Heatwave MaharashtraPudhari
Published on
Updated on

Sambhajinagar Crop Damage

कन्नड : यंदाच्या पावसाळ्यात पावसाने सातत्याने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. श्रावण महिन्यात अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यानंतर गणेशोत्सवात तरी पाऊस बरसेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र गणपती बाप्पाच्या आगमनानंतरही पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र असून सप्टेंबर महिन्याचा निम्मा कालावधी उलटून गेला असतानाच उन्हाचे चटके जाणवू लागल्याने खरीप पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ग्रामीण भागात श्रावण महिन्यात पावसाच्या सरी बरसतात, अशी पारंपरिक धारणा आहे. श्रावणात पाऊस कमी झाला तर गणपती बाप्पाच्या स्थापनेनंतर दहा दिवस पाऊस पडतो, अशीही ग्रामीण भागात म्हण आहे. यंदा मात्र पारंपरिक ऋतूचक्रासह विविध हवामान अंदाजांकडूनही पावसाबाबत अपेक्षा व्यक्त झाल्या असल्या तरी प्रत्यक्षात पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी संभ्रमात आहे.

मका पिकाला मोठा फटका

कन्नड तालुक्यात मका हे प्रमुख खरीप पीक असून दरवर्षी या पिकातून मोठी आर्थिक उलाढाल होते. मात्र यंदा पावसाचा खंड आणि पाण्याअभावी मक्याची वाढ खुंटली आहे. अनेक ठिकाणी मक्याचे पीक अपेक्षित वाढीपर्यंत पोहोचलेले नाही. जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याने काही शेतकरी उभ्या मक्याची कुट्टी करून त्याची विक्री करत आहेत. त्यामुळे मक्याच्या उत्पादनाबरोबरच बाजारपेठेतील उलाढालीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

कापूस, तूर अन् ऊसाची वाढ खुंटली

मक्यासोबतच कापूस व तूर पिकांनाही पावसाच्या कमतरतेचा फटका बसला आहे. कापसाची वाढ आणि अपेक्षित बोंडधारणा यावर परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. तूर पिकाचीही वाढ समाधानकारक झालेली नाही.

बागायती क्षेत्रातील ऊस पिकालाही पावसाच्या कमतरतेचा फटका बसला आहे. उपलब्ध पाण्यावर ऊस जगविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत असले तरी पुरेशा पावसाअभावी उसाची वाढ अपेक्षेप्रमाणे होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांसह बागायतदार शेतकरीही अडचणीत आले आहेत.

उन्हाच्या चटक्याने चिंता वाढली

सप्टेंबरमध्येच उन्हाची तीव्रता जाणवू लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. पिकांना ऐन वाढीच्या व उत्पादनाच्या टप्प्यावर पाण्याची गरज असताना पाऊस गायब झाल्याने खरीप हंगामाचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता आभाळाकडे लागले असून, पावसाच्या प्रतीक्षेत बळीराजाची उदासीनता वाढत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news