

पैठण : अहिल्यानगर येथून एक वर्षासाठी हद्दपार असलेल्या आरोपीने पैठण येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या तक्रारदार महिलेच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पैठण पोलिसांत शनिवार (दि.२२) गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी, अहिल्यानगर येथून एक वर्षासाठी हद्दपार झालेल्या अंतोन शामसुंदर गायकवाड (रा.नागापुर) हा आरोपी हद्दपारच्या काळात पैठण येथील एका महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. तक्रारदार महिला आपल्या मुलीला घरात ठेवून दुसऱ्या मुलीला भेटण्यासाठी बाहेरगावी गेली होती. यादरम्यान या आरोपीने तक्रारदार महिलेच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. व हा प्रकार कोणाला सांगितल्यास तर तुला ठार मारेन, अशी धमकी दिली. या घडलेल्या प्रकाराची माहिती मुलीने आपल्या आईला दिल्यानंतर आईने पोलिस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पैठण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरुकुल हे करीत आहेत.