

छत्रपती संभाजीनगर : अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर घरोघरी आम्ररसाचा बेत आखला जात असल्याने शहरातील बाजारपेठेत सुमारे तीन ते साडेतीन हजार क्विंटल आंब्यांची आवक झाली आहे. यात केरळचा रसरशीत लालबाग आणि गुजरातच्या केसर आंब्याला ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे, अशी माहिती आंबा विक्रेते नासेर बागवान यांनी दिली.
अक्षय तृतीयेला देवाला आंब्याचा रस आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. त्यामुळे बाजारात हापूस, लालबाग, केसर आणि बदाम आंबा मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे. यंदा अक्षय तृतीया दोन आठवडे लवकर आल्याने नैसर्गिकरित्या मोहर पिकण्यास विलंब झाला आहे, मात्र मुहूर्तासाठी कृत्रिमरित्या पिकवलेले आंबे बाजारात मुबलक उपलब्ध आहेत. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे गावरान आंब्यांचे नुकसान झाले असून, अद्याप हे आंबे विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे खवय्यांना गावरान, पायरी आणि दशहरी आंब्यांसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.
असे आहेत दर (प्रति किलो)
हापूस : ३०० ते ३५० रुपये
केसर : २०० ते २४० रुपये
लालबाग : १८० ते २०० रुपये
बदाम : १६० ते १८० रुपये