

पिशोरः कन्नड तालुक्यातील पिशोर येथे गुरुवारी दुपारी विज पडल्याने तीन महिलांचा मृत्यू झाला.तर दोन महिला एक पुरुष जखमी झाले. याबाबत सविस्तर माहिती अशी की पिशोर येथील वाघुळखेडा शिवारातील गट क्रमांक ७१ मध्ये शेतकरी शेतात काम करत होते अचानक दुपारी पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी झाडाचा आसरा घेत कवठाच्या झाडाखाली उभे राहिले. त्याचवेळी त्याठिकाणी वीज पडल्याने पाच महिला व एक पुरुष यांच्यावर वीज पडली .
याबाबतची माहिती आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मिळाली शेतकऱ्यांनी लगेच त्या ठिकाणी धाव घेतली. व ॲम्बुलन्स ला बोलावले सहा जणांना पिशोर ग्रामीण रुग्णालयात आणले यात तीन महिलांचा मृत्यू झाला. मयत फरजाना हमीद सय्यद (वय ३८) अलविरा हनीफ सय्यद (वय१६) तसलीम बानो मुक्तार सय्यद (वय५०) अशी त्यांची नावे आहेत. तसेच हफिस शेख खलील वय 22 वर्ष , हमिदा हनीफ सय्यद 32 वर्ष , अनिसा सय्यद निसार वय 35 वर्ष या जखमी झाल्या. त्यांना छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.
मयत महिलांवर पिशोर ग्रामीण रुग्णालयात प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. धीरज पाटील यांनी शविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले
पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी, बीट अमलदार दत्तू लोखंडे, दत्तात्रय मोरे, कौतिक सपकाळ, विजय भोटकर, यांनी पंचनामा करून पिशोर पोलीस ठाण्यात अकस्मिक नोंद घेण्यात आली. याप्रसंगी कन्नड तहसीलदार सारिका भगत , तलाठी केवलचंद बहुरे कोतवाल अरुण शेख यांनी मयताच्या कुटुंबाला भेट दिली. तहसीलदार सारिका भगत यांनी सांगितले मयताच्या कुटुंबाला लवकरात लवकर मदत देण्याचे आश्वासन दिले.
घटनेची माहिती मिळताच कन्नड तालुक्याच्या आमदार संजनाताई जाधव तसेच तहसीलदार श्रीमती सरिका भगत, सहाय्यक पोलिस निरीक्षक कुणाल सुर्यवंशी यांनी पिशोर ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. जखमींना मिळत असलेल्या उपचारांची पाहणी करत संबंधितांकडून माहिती जाणून घेतली.
यावेळी जाधव यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे म्हटले. तसेच मृत व जखमींच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने जी काही मदत करता येईल, ती सर्वतोपरी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.