

Kannad Farmer Electrocution Death
कन्नड : कन्नड तालुक्यातील अंधानेर येथे वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असताना विजेचा तीव्र धक्का लागून ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी घडली. सुरेश विठोबा दापके (वय ३५, रा. अंधानेर) असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी कन्नड तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीजवाहिन्यांवर झाडांच्या फांद्या पडल्या होत्या. त्यामुळे अंधानेर परिसरातील वीजपुरवठा रात्रभर खंडित झाला होता.
मंगळवारी दुपारच्या सुमारास तुटलेल्या तारा जोडणे आणि झाडांच्या फांद्या हटविण्याचे काम सुरू होते. यावेळी गावातील एका रोहित्रावरील (डीपी) डीयू वादळामुळे खाली पडल्याने ते पुन्हा बसविण्याचे काम करण्यात येत होते. नातेवाईकांच्या माहितीनुसार, महावितरणच्या वायरमनने वीजपुरवठा बंद करण्यासाठी आवश्यक परमीट घेतल्याचे सांगितल्याने सुरेश दापके हे निश्चिंतपणे रोहित्रावर चढले.
मात्र, डीयू बसवित असतानाच अचानक वीजप्रवाह सुरू झाला आणि त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. या धक्क्यामुळे ते रोहित्रावरून खाली कोसळले. गंभीर जखमी झालेल्या सुरेश यांना नागरिक आणि नातेवाईकांनी तातडीने कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध गायकवाड यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर महावितरणच्या कार्यपद्धतीबाबत संताप व्यक्त करण्यात येत असून, निष्काळजीपणामुळे हा बळी गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मृत सुरेश दापके यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे अंधानेर गावात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, या प्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.