

करमाड (छत्रपती संभाजीनगर) : पंचायत समिती गणातील सय्यदपूर येथील गावाला जोडणारा नळकांडी पूल वाहून गेल्याने गुडघाभर पाण्यातून वाट काढत आरोग्य केंद्र गाठले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सय्यदपूर येथील कोमल अजय सिरसाठ यांना प्रसूती वेदना होत असल्याने शिवाय दुधना नदीला पुरात नळकांडी पूल वाहून गेल्याने सोमवारी (दि.28) सायंकाळी सहा वाजता गुडघाभर पाण्यातून वाट काढत लाडसावंगीचे प्राथमिक आरोग्य केंद्र गाठावे लागले. शनिवारी (दि.26) रात्री दुधना नदीला मोठा पूर आल्याने लाडसावंगी सय्यदपूर गावाला जोडणारा नळकांडी पूल वाहून गेला. शिवाय सय्यदपूर गावाला जायला रस्ता नसल्याने सोमवारी गावातील विद्यार्थ्यांना शाळेला दांडी मारण्याची वेळ आली. या गावातील पन्नास विद्यार्थी लाडसावंगी येथील शाळेत दररोज यावे लागते. मात्र पूर येऊन दोन दिवस उजाडले तरी पुराचे पाणी अद्याप गुडघ्यालगत वाहत असल्याने गावात कोणत्याच प्रकारची वाहने जात नाही. यात सोमवारी (दि.28) सायंकाळी सहा वाजेदरम्यान कोमल सिरसाठ यांना प्रसूतीपूर्व वेदना सुरू झाल्याने घरातील महिलांनी रुग्णाला गुडघाभर पाण्यातून वाट काढत आरोग्यकेंद्र गाठले.