

छत्रपती संभाजीनगर : दागिने बनविण्याचा बहाणा करून एका बंगाली कारागिराने शहरातील व्यापारी आणि सराफांचे तब्बल १८ तोळे सोने घेऊन पोबारा केला. हा प्रकार जुना बाजार भागात उघडकीस आला. मेघनाथ बिमल रॉय (४१, रा. हुगली, पश्चिम बंगाल) असे आरोपीचे नाव आहे. तो कुटुंबासह फरार झाला आहे.
फिर्यादी अब्दुल लतीफ अब्दुल कादर (४८, रा. जुनाबाजार) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्याच मालकीच्या घरात मागील १३ वर्षांपासून मेघनाथ हा कारागीर भाड्याने राहत होता. त्याचा विश्वास संपादन झाल्यामुळे फिर्यादीने सप्टेंबर २०२५ मध्ये त्याला ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (कडा व अंगठी) नेकलेस बनवण्यासाठी दिले होते. केवळ फिर्यादीच नव्हे तर आरोपीने शहरातील इतर नामांकित सराफांनाही गंडा घातला आहे.
उदय सराफ यांच्याकडून दागिने बनवण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी घेतलेले सुमारे ५९ ग्रॅम ५०० मिली शुद्ध सोने, के.एम. गोल्ड (शेख कदीर) यांच्याकडून ग्राहकांना देण्यासाठी नेलेले ३६ ग्रॅमचे सोन्याचे झुमके आणि २१ ग्रॅम ६०० मिलीच्या सोन्याच्या वाटी असा ऐवज त्याने लंपास केला. दिवाळीच्या हंगामाचे कारण सांगून आरोपीने वेळकाढूपणा केला. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी फिर्यादी त्याच्या घरी गेले असता, घराचा दरवाजा उघडा होता मात्र आरोपी कुटुंबासह आणि दुकानातील साहित्यासह गायब झाला होता. त्याचा मोबाईल क्रमांकही बंद येत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.
२० वर्षांच्या विश्वासाला तडा
आरोपी रॉय हा उदय सराफ यांचे गेल्या २० वर्षांपासून दागिने बनविण्याचे काम करत होता. तो फिर्यादीच्या घरात १३ वर्षांपासून कुटुंबासह राहत होता. त्याने विश्वासघात करून फसवणूक केल्याने अखेर कादर यांनी सिटी चौक ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुरुवारी (दि. २६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.