Hatnur News| वंशाचा दिवा विझला अन् मग पेटले उड्डाणपुलावरील दिवे!

‘पुढारी’च्या वृत्ताची दखल : अखेर सहा महिन्यांनंतर हतनूर उड्डाणपुलावरील पथदिवे सुरू
वंशाचा दिवा विझला अन् मग पेटले उड्डाणपुलावरील दिवे!
वंशाचा दिवा विझला अन् मग पेटले उड्डाणपुलावरील दिवे!
Published on
Updated on

कन्नड : तालुक्यातील हतनूर येथील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलावर गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले पथदिवे अखेर सुरू करण्यात आले आहेत. मात्र, हे दिवे सुरू होण्यासाठी एका कुटुंबाचा एकुलता एक वंशाचा दिवा विझण्याची दुर्दैवी घटना घडल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे. ‘दैनिक पुढारी’ने सातत्याने हा प्रश्न लावून धरल्यानंतर अखेर संबंधित विभागाला जाग आली आहे.

हतनूर येथील साईराज योगेश बिडवे (वय २०) या महाविद्यालयीन तरुणाचा ८ ऑगस्ट रोजी उड्डाणपुलावर झालेल्या दुचाकीच्या अपघातात मृत्यू झाला. रात्रीच्या वेळी उड्डाणपुलावर पुरेसा प्रकाश नसल्याने बायपास रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याची दुचाकी दुभाजकाला धडकली. या दुर्घटनेत साईराजचा दुर्दैवी मृत्यू झाला. तो कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने या घटनेने बिडवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून हतनूरसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

वंशाचा दिवा विझला अन् मग पेटले उड्डाणपुलावरील दिवे!
Hatnur Accident | हतनूर महामार्गावर दुचाकी दुभाजकाला धडकली; वाढदिवशी तरुणावर काळाचा घाला

सहा महिन्यांपासून अंधाराचे साम्राज्य

राष्ट्रीय महामार्गावरील हतनूर उड्डाणपुलावरील पथदिवे तब्बल सहा महिन्यांपासून बंद होते. रात्रीच्या वेळी या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. मात्र, उड्डाणपुलावर अंधार असल्याने वाहनचालकांना रस्त्याचा, दुभाजकाचा तसेच बायपासकडे जाणाऱ्या मार्गाचा अंदाज घेण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला होता.

पथदिवे बंद असल्याचा मुद्दा ‘दैनिक पुढारी’ने सातत्याने मांडला होता. तरुणाच्या अपघाती मृत्यूनंतर नागरिकांमधूनही महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अखेर या वृत्ताची दखल घेत महामार्ग विभागाने उड्डाणपुलावरील पथदिवे सुरू केले आहेत.

पथदिवे सुरू झाल्याने वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी, ‘एकुलता एक वंशाचा दिवा विझल्यानंतरच महामार्ग विभागाला जाग का आली?’ असा संतप्त सवाल हतनूर ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी महामार्गावरील सर्व पथदिवे नियमित सुरू ठेवावेत आणि प्रकाशयंत्रणेची वेळोवेळी तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news