

दादासाहेब गलांडे
पैठण : छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील राजकारण आणि सहकार क्षेत्रातील महत्त्वाची संस्था मानली जाते. बँकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपली. या निवडणुकीत दोन मंत्री, एक खासदार, पाच आमदार, माजी आमदार तसेच अनेक सहकार क्षेत्रांतील दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
मात्र जिल्ह्याच्या राजकारणासह सहकार क्षेत्रात खासदार संदीपान भुमरे यांनी पुन्हा एकदा आपला प्रभाव सिद्ध केला आहे. तब्बल २९ वर्षे जिल्हा बँकेचे संचालक राहिलेल्या खासदार भुमरे यांनी यंदा आपल्या पुत्राला, आमदार विलास भुमरे यांना सहकार क्षेत्रात पुढे आणले असून त्यांचे पहिले पाऊलच यशस्वी ठरले आहे.
विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या आमदार विलास भुमरे यांच्या विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने ते बिनविरोध संचालकपदी निवडून आले आहेत. अधिकृत घोषणेची केवळ औपचारिकता बाकी आहे. जिल्ह्यातील इतर कोणत्याही मतदारसंघात अशी परिस्थिती निर्माण झाली नसताना भुमरे यांना बिनविरोध निवडून आणण्यात यश मिळाल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे.
आ. विलास भुमरे यांनी २०२३ मध्ये रेणुकादेवी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात सक्रिय भूमिका स्वीकारली. त्यांनी कारखान्याला नवसंजीवनी देण्यासाठी विविध उपक्रम राबविले. त्यामुळे कमी वयातच त्यांना सहकार क्षेत्राचा चांगला अनुभव मिळाला आहे. जिल्हा बँकेतील त्यांची एन्ट्री ही सहकार क्षेत्रातील नव्या नेतृत्वाची नांदी मानली जात आहे.
खासदार भुमरे सलग २९ वर्षे संचालक
जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचा सर्वाधिक अनुभव आणि अभ्यास खासदार संदीपान भुमरे यांच्याकडे असल्याचे मानले जाते. ते सलग २९ वर्षे जिल्हा बँकेचे संचालक राहिले आहेत. नव्या सहकार नियमांमुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र या काळात त्यांनी सभासद व शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत सहकार क्षेत्र बळकट करण्यासाठी काम केले. बँकेतील अनेक पदाधिकाऱ्यांवर विविध आरोप झाले तरी कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोन मंत्री, एक खासदार, पाच आमदार, तीन नगराध्यक्ष, माजी आमदार आणि अनेक सहकारी संस्थांचे पदाधिकारी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र जिल्ह्यातील कोणत्याही अन्य नेत्याला बिनविरोध निवडून येता आलेले नाही. ही किमया भुमरे पिता-पुत्रांनी साध्य केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकत्यपिक्षा राजकीय पार्श्वभूमी असलेले उमेदवारच अधिक प्रमाणात मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.