

कन्नड : तालुक्यातील वडाळी येथे वडाळी-जैतखेडा रस्त्यावरील खासगी दूध डेअरीच्या परिसरात विजेचा जोरदार धक्का लागून अक्षय नामदेव खिल्लारे (वय २७, रा. जैतखेडा ता. कन्नड) या तरुणाचा मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले. ही घटना रविवारी (दि.२७) घडली असून याबाबत अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.
अक्षय खिल्लारे हा वडाळी येथील खासगी दूध डेअरीत काम करीत होता. कामादरम्यान बाहेरील परिसरात त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. त्याला तातडीने कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेत विक्की सुभाष खिल्लारे (रा. जैतखेडा) आणि नारायण शिवाजी दांगोडे (रा. सावखेडा, ता. खुलताबाद) हे दोघे जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अक्षय हा कुटुंबातील एकुलता एक कमावता मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि तीन वर्षांची चिमुकली मुलगी असा परिवार आहे. त्याच्या आकस्मिक मृत्यूने खिल्लारे कुटुंबासह जैतखेडा गावावर शोककळा पसरली आहे. विजेचा शॉक नेमका कशामुळे लागला, याचे कारण स्पष्ट झाले नसून पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहे.