

छत्रपती संभाजीनगर : मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दाखल २०१२ सालच्या विवाहितेचा छळ व जीवघेणा हल्ला केल्याच्या गुन्ह्यातील सहा आरोपींनी न्यायालयात तारखेला हजर झाल्यानंतर एमसीआरची ऑर्डर होताच पलायन केले. ही घटना सोमवारी (दि. २२) सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्हा व सत्र न्यायालयात घडली. दरम्यान, गुन्हा दाखल होताच वेदांतनगर पोलिसांनी सहाही आरोपींना पकडून पुन्हा मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींची हसूल जेलमध्ये रवानगी केल्याची माहिती पोलिस निरीक्षक प्रविणा यादव यांनी दिली.
शेख जुफियाबी शेख मुनाफ (३०), वाहेद खान अली खान पठाण, बाबा वाहेद खान पठाण (२२), जमीर खान वाहेद खान पठाण (२०), सुलतानाबी शेख बाबू (४०) आणि शेख मोईन शेख बाबू (२२, सर्व रा. गारखेडा गाव) अशी आरोपींची नावे आहेत.
भाऊसाहेब बोर्डे यांच्या तक्रारीनुसार, ते कोर्ट पैरवी म्हणून ड्यूटीवर होते. मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात २०१२ सालच्या गुन्हातील शेख मुनाफ शेख गुलाब (३२) यांच्यासह अन्य सहा आरोपी तारीख असल्याने न्यायालयात हजर झाले होते. त्यांना जिल्हा व सत्र न्यायदंडाधिकारी आर. डी. खेडकर यांनी हसूल कारागृहात दाखल करण्याचे रिमांड वॉरंट काढले. सर्व आरोपी बोर्डे यांच्या ताब्यात दिले. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास आरोपींना घेऊन अंमलदार बोर्डे थांबले होते. तेव्हा न्यायालयीन क्लर्क वखरे यांच्याकडून वॉरंट घेण्यासाठी गेले. परत आले तेव्हा शेख मुनाफ एकटाच दिसला. उर्वरित सहा आरोपी पळून गेले होते. आरोपींचा नातेवाईक शेख समीरने सर्व आरोपींना फोन केला तेव्हा त्यांनी आम्ही परत येत नाही, असे स्पष्ट सांगितले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने वेदांतनगर पोलिस ठाण्यात अंमलदार बोर्डे यांनी तक्रार देऊन गुन्हा नोंद केला. मंगळवारी (दि.23) पुन्हा सहाही आरोपींना पकडण्यात फिर्यादी पोलिस अंमलदार आले.