Chhatrapati Sambhajinagar Gutkha Seizure : अपघातग्रस्त कारमध्ये गुटख्याचा ‘खजिना’; मालाच्या पिशव्या लांबवल्याची चर्चा

सिल्लोड ग्रामीण पोलिसांची कारवाई; ५ लाख ६९ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त, अपघातानंतर कथित लूट
Chhatrapati Sambhajinagar Gutkha Seizure
Chhatrapati Sambhajinagar Gutkha SeizurePudhari
Published on: 
Updated on: 

सिल्लोड : प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या अपघातग्रस्त कारमधून तब्बल ५ लाख ६९ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी जप्त केला. बोजगाव-अंभई रस्त्यावर झालेल्या या कारवाईत प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा उघड झाला. दरम्यान, अपघातानंतर कारमधील मालाच्या काही पिशव्या तरुणांनी परस्पर लांबवल्याची चर्चा घटनास्थळी उपस्थित प्रत्यक्षदर्शींमध्ये सुरू असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बोजगाव शिवारातील बोजगाव-अंभई रस्त्यावर पांढऱ्या रंगाची कार अपघातग्रस्त अवस्थेत आढळली. वाहनाची तपासणी केली असता त्यातून प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कारमधील प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त केला.

५ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त

कारवाईदरम्यान केसरयुक्त विमल पानमसाल्याचे ७७० पुडे, प्रीमियम झेड एन ०१ जाफरानी तंबाखूचे २२० पुडे, व्ही-१ सुगंधित तंबाखूचे २२० पुडे आणि व्ही-१ बिग सुगंधित तंबाखूचे ११० पुडे जप्त करण्यात आले. या तंबाखूजन्य पदार्थांची किंमत १ लाख ६९ हजार ९१० रुपये असून, अपघातग्रस्त कारची किंमत अंदाजे ४ लाख रुपये आहे. असा एकूण ५ लाख ६९ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

अपघातानंतर मालाच्या पिशव्या लांबवल्याची चर्चा

अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या काही तरुणांनी कारमधील गुटखा, तंबाखू व पानमसाल्याच्या पिशव्या बाहेर काढून नेल्याची चर्चा प्रत्यक्षदर्शींमध्ये सुरू आहे. परिसरातील काही तरुणांनी मालाच्या पिशव्या परस्पर लांबवल्याचे सांगितले जात असले, तरी हा प्रकार नेमका किती प्रमाणात घडला, किती माल गायब झाला आणि याबाबत अधिकृत नोंद झाली आहे का, याची अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे जप्त केलेल्या मालाची नोंद आणि कथित प्रकाराची पडताळणी महत्त्वाची ठरणार आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी मोहम्मद फरीद अब्दुल रशीद सिद्दीकी यांच्या फिर्यादीवरून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अपघातग्रस्त वाहनाचा अज्ञात चालक व मालक, तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशातील संबंधित उत्पादक व पुरवठादार कंपन्यांचे मालक व संचालक यांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक, पुरवठा व वितरणाच्या साखळीचा तपास सुरू आहे.

अपघातग्रस्त कारमधून प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळणे आणि अपघातानंतर मालाच्या पिशव्या लांबवल्याची चर्चा समोर येणे, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रतिबंधित मालाचा पुरवठा कुठे होणार होता, या व्यवसायाचे जाळे किती व्यापक आहे आणि अपघातानंतर माल लांबविण्याचा कथित प्रकार प्रत्यक्षात घडला का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनिष जाधव करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.