छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बाबा पेट्रोलपंप चौकाकडून छावणीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील लोखंडी पुलावर एका कारला वाचवताना आयशर टेम्पोचा अपघात झाला. लोखंडी कठडे तुटल्याने टेम्पोचा अर्धा भाग पुलावरून खाम नदीत लटकला. टेम्पो कोसळणार तेवढ्यात कठडे आणि तेथील बॅनरला अडकला. सुदैवाने टेम्पो नदीत कोसळला नाही. यात चालक वालंबाल बचावला. १७ ऑक्टोबरला पहाटे २ वाजता हा अपघात झाला. त्यानंतर बराचवेळ वाहतूक खोळंबली होती, अशी माहिती पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी दिली.
अधिक माहितीनुसार, आयशर टेम्पो (एमपी ०४, जीए २२७४) हा बाबा चौकाकडून नगर नाक्याच्या दिशेने निघाला. लोखंडी पुलावर अचानक लोखंडी पुलावरील जाळी तोडून आयशर टेम्पो कठड्याला जाऊन लटकल्याने दुर्घटना टळली. एक कार टेम्पोला आडवी आली. त्या कारला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने टेम्पो डावीकडे वळविला. त्यामुळे पुलाचे कठडे तोडून अर्धा टेम्पो पुलावरून टकला.
टेम्पो खाम नदीत कोसळणार तेवढ्यात उर्वरित कठडे आणि तेथील एका बॅनरला अडकला. त्यानंतर वाहतुकीचा खोळंबा झाला. तेथे एका बाजूनेच दोन्हीकडील वाहतूक वळविली. सकाळी १० वाजता क्रेन आणून टेम्पो काढण्याचे काम सुरू केले होते. मात्र, दिवसभर यश आले नाही. वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक भंडारे, छावणी ठाण्याचे निरीक्षक दिलीप ठाकूर, उपनिरीक्षक विकास खटके यांनी प्रयत्न करून चालकाला बाहेर काढले. त्यानंतर दिवसभर एका बाजूने वाहतूक वळविण्यात आली होती.