

छत्रपती संभाजीनगर : एमजीएम हॉस्पिटल जवळून एका १९ वर्षीय तरुणाचे ओळखीच्या व्यक्तींनीच अपहरण केल्याची घटना शनिवारी (दि.1) सायंकाळी 5 वाजता समोर आली. दरम्यान अपहरण झालेला तरुण बीड बायपास परिसरात मिळून आला. या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु अपहरणकर्ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत. पुंडलिक नगर परिसरातून अपहरण झालेल्या चैतन्य तुपे याच्या अपहरणाच्या घटनेला महिना उलटलेला नसताना दुसरी घटना समोर आल्याने शहरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
विशेष म्हणजे अपहरणकर्ते तरुणाच्या ओळखीचे होते, मात्र त्यांची नावं अजून समोर आलेली नाहीत. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. पोलिसांनी तरुणास रुग्णालयात प्राथमिक तपासणीसाठी नेले आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. तूर्तास अपहरणकर्त्यांचे हेतू स्पष्ट झालेले नाहीत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सातारा पोलिस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे.