

जे. ई. देशकर
छत्रपती संभाजीनगर : थंडीचा चाहूल लागण्याअगोदरच विदेशी पक्ष्यांचे आगमन जायकवाडीसह विविध जलाशयांत देशीसह विदेशी पक्ष्यांची शाळा भरली आहे. जिल्ह्यातील विविध जलाशयांवर करकोचे, कृष्ण क्रौंच, कुरव, सुरय, सारंग, कुकरी गरुड, मॉन्टेगुचा भोवत्या, आकाश योगिनी, चक्रवाक बदक, थापट्या बदकांसह इतर पक्ष्यांनी हलाराे किलोमीटरचा अंतर पार करत आगमन केले आहे.
जायकवाडी जलाशय हा पाणथळीचा तलाव असल्याने सूर्यप्रकाश तळापर्यंत जातो. येथे विविध जल वनस्पती, शेवाळ यांची निर्मिती होते. या वनस्पती, शेवाळ खाण्यासाठी झिंगे, खेकडे, मासे येतात. त्याच्यावर उपजीविका करण्यासाठी विविध पक्षी, जलचर प्राणी, सरीश्रूप जीव हे पाण्यावर आढळतात. २४५ प्रकारचे पक्षी आतापर्यंत या जलाशयावर आढळून आलेले आहेत. ज्यामध्ये ८४ प्रकारचे पक्षी हे स्थलांतरित आहेत. तर उर्वरित पक्षी हे स्थानिक आहेत. पक्षांमध्ये १५ ते १२५ सेंटीमीटर उंचीपर्यंतचे पक्षी जायकवाडी जलाशयावर दाखल झाले आहेत.
स्थानिक पक्षी तलावावर बारा महिने दिसून येतात ते इथेच प्रजनन करतात. तर स्थलांतरित पक्षांमध्ये उत्तरेकडून येणारे पक्षी आणि दुसरे म्हणजे युरोप, मध्य आशिया, तिबेट, सायबेरिया, कजाकिस्तान या भागातून येतात. हिवाळ्यात युरोपमध्ये आशिया, उत्तर प्रदेश या भागामध्ये बर्फवृष्टी होत असल्याने हे पक्षी खाद्याच्या शोधात भारतात येतात. यातील अनेक पक्षी जिल्ह्यातील विविध जलाशयांवर दाखल झाले आहेत.
सप्टेंबर महिन्यापासूनच पक्ष्यांचे आपल्याकडे येणे सुरू होते. ही संख्या नोव्हेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढते. स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्काम फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत राहतो. त्यानंतर ते परतीच्या प्रवासाला लागतात. यात काही जमिनीवर राहणारे, काही झाडांवर तर काही पाण्यावर मुक्काम करणाऱ्या पक्ष्यांचा समावेश आहे. जायकवाडी जलाशयाबरोबर सुखना, ढेकू, गिरीजा, अंबाडी, सलीम अली सरोवर या तलावांवर या पक्ष्यांचा मुक्काम असतो.
स्थलांतरित पक्ष्यांमध्ये रोहित पक्षी, करकोचे, कृष्ण क्रौंच, कुरव, सुरय, सारंग, कुकरी गरुड, मॉन्टेगुचा भोवत्या, आकाश योगिनी, चक्रवाक बदक, थापट्या बदक, शेंडी बदक ,पट्टेरी हंस, मानमोड्या, मलीन बदक, तापस, माळ भिंगरी, भोर्डी मैना, चमकदार सराटी, पानतीवळे, चिखले, पाणलावे असे स्थलांतर तर शराटी, नदीसुरे, पान कोंबडी, कमळ पक्षी, सारंग, बगळे, पानकावळे, कानुकबदक, वारकरी, पाणदुबी, धनवर बदक आदी स्थानिक पक्ष्यांचा समावेश असल्याची माहिती मानद वन्य जीवरक्षक डाॅ. किशोर पाठक यांनी दिली.