

रमाकांत बनसोड
गंगापूर : उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या २० लिटर जारच्या थंड पाण्याबाबत गंभीर व धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. पाणी शुद्धीकरणाच्या नावाखाली काही ठिकाणी संशयास्पद रासायनिक द्रव्यांचा वापर होत असल्याची चर्चा असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही पाणी पुरवठादारांकडून योग्य पद्धतीने शुद्धीकरण न करता जलद प्रक्रियेसाठी रसायनांचा वापर केला जात असल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षात पिण्याच्या पाण्याची शुद्धीकरण प्रक्रिया ही शास्त्रीय पद्धतीने (फिल्ट्रेशन, डिसइन्फेक्शन, यूव्ही/आरओ प्रक्रिया) केली जाणे आवश्यक असते. या प्रक्रियेमध्ये जंतू, बॅक्टेरिया, धातू व इतर घातक घटक काढून टाकले जातात. मात्र, याऐवजी शॉर्टकट म्हणून रासायनिक पदार्थांचा वापर झाल्यास ते थेट मानवी शरीरावर परिणाम करू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. नागरिकांच्या तक्रारींकडे पाणी विक्रेते दुर्लक्ष करत आहेत.
गेल्या काही दिवसांत शहरातील विविध भागांत पाण्याची चव बदलणे, वास येणे, पाण्याचा रंग किंचित बदललेला दिसणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. अनेकांनी संबंधित विक्रेत्यांकडे तक्रार केली असली तरी त्यावर ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याबाबत गंगापूर नगरपालिकेने संबंधित जार विक्रेते यांचे पाण्याची नियमित तपासणी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. तसेच पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरसाठी सरकारकडून ठराविक मानके व परवाने आवश्यक असतात. यामध्ये पाण्याची नियमित तपासणी, स्वच्छता, मशिनरीची देखभाल व गुणवत्ता नियंत्रण बंधनकारक असते. मात्र, काही ठिकाणी हे नियम धाब्यावर बसवले जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरपालिका प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.
...तर कारवाई करू स्वच्छ पाणी हा प्रत्येकाचा हक्क आहे; त्यात कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. आरोग्ये पाणी विकणाऱ्या विरोधात तक्रार आल्यास त्याची दखल त्वरित घेतली जाईल. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. नागरिकांनीही विश्वासार्ह पुरवठादाराकडूनच पाणी घ्यावे, शक्य असल्यास घरी शुद्धीकरण यंत्राचा वापर करावा, पाण्याची चव, वास बदलल्यास लगेच वापर थांबवावा.
- संतोष आगळे, मुख्याधिकारी न.पा. गंगापूर.
अशुद्ध किंवा रसायनयुक्त पाण्याचे नियमित सेवन केल्यास किडनीवर ताण व दीर्घकालीन नुकसान, हृदयविकाराचा धोका वाढणे, पोटाचे विकार, जुलाब, उलट्या, डोकेदुखी, थकवा व अशक्तपणा, शरीरातील विषारी द्रव्यांची वाढ होते. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना याचा अधिक धोका आहे. यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी.
- डॉ. राजेश गुडदे, विठाई हॉस्पिटल, गंगापूर.