

छत्रपती संभाजीनगर : मार्तंड भैरव (खंडोबा) षडरात्रोत्सवाचे बुधवारी (दि. २६) चंपाषष्ठीनिमित्त उत्थापन होत आहे. खंडोबा मंदिरात रुद्राभिषेक करून खंडोबाला वांग्यांचे भरीत-रोडगा, पुरणपोळी व छप्पनभोगचा नैवेद्य अर्पण करून महाआरती केली जात आहे. रेवड्या व हळदीच्या भंडाऱ्याची उधळण करून मयळकोट यळकोट जय मल्हार, मल्हारी मार्तड की जयफ्चा जयघोष करीत खंडोबा यात्रेला प्रारंभ होणार आहे. खंडोबाच्या तीनदिवसीय यात्रेला सुरुवात होणार आहे.
देवदीपावली म्हणून २१ नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष शुद्धप्रतिपदेला मार्तंड भैरव षडरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. त्यानिमित्त घराघरात खंडोबाची घटस्थापना करण्यात आली. खंडोबा मंदिरातही घटस्थापना करण्यात आली. सहा दिवसांच्या पारण्यांचा समारोप बुधवारी (दि.२६) चंपाषष्ठीला होणार आहे. चंपाषष्ठीला खंडोबा मंदिरात पहाटे पाच वाजता खंडोबा मूर्तीला रुद्राभिषेक करून नवीन वस्त्रे परिधान करून वाग्यांचे भरीत, बाजरीचा रोडगा यासह पुरणाचा व छप्पन्न भोगचा नैवेद्य अर्पण करून महाआरती केली जाणार आहे. खंडोबा मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष रमेश चोपडे, सचिव साहेबराव पळसकर, पुजारी दिलीप धुमाळ, विशाल धुमाळ, विजय धुमाळ यांच्यासह सदस्य यांच्या हस्ते आरती होणार आहे. मंदिर विश्वस्त समितीकडून मान्यवर, पोलीस, स्वयंसेवकांसाठी बाजरी-ज्वारीची भाकरी, वांग्याचे भरीत या प्रसादाचे वाटप केले जाणार आहे. बुधवारी पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी मंदिरात गर्दी करतात. त्यामुळे रांगेत भाविकांना दर्शन दिले जाते.
तीन दिवस खंडोबा यात्रा
२६ ते २९ नोव्हेंबरदरम्यान तीनदिवसीय यात्रेसाठी विविध दुकाने, हॉटेल, तमाशा यासह खेळणीचे दुकाने थाटण्यात आले आहे. चंपाषष्ठीनिमित्त तीन दिवस यात्रेच्या काळात खंडोबा मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. रेवड्या खोबरे आणि हळदीच्या बेलभंडाऱ्याची उधळण करीत 'यळकोट यळकोट जयमल्हार'चा जयघोष करीत भाविक दर्शन घेतात. खंडोबा मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळणार आहे. त्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, २५ पोलिस कर्मचारी व अधिकारी राहतील. तसेच दोनशे स्वयंसेवकही राहणार आहेत.
पालखी मिरवणूक
चंपाषष्ठीनिमित्त खंडोबा मूर्तीची पालखी काढली जाणार असून, जहागीदार (दांडेकर) यांच्या वाड्यात ही पालखी जाणार आहे. दिवसभर त्या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होतील. त्यानंतर रात्री पालखी मिरवणुकीने मूर्ती मंदिरात आणण्यात येईल.
घराघरांत तळी उचलणार
चंपाषष्ठीनिमित्त खंडोबा घटउत्थापनाला घराघरांत मार्तंड भैरवाला पुरण-पोळीसह रोडगा-वांग्याचे भरीत याचा नैवेद्य अर्पण करून तळी उचलली जाणार आहे. हळदीचा भंडारा व गूळ-खोबरे दिले जाणार आहे.