

कन्नड : तेलवाडी लगत धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर दि. ११ रोजी अज्ञात वाहनाने मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने मोटारसायकल वरील दोन जण ठार एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती .शहर पोलीस व नागरिक यांच्या मदतीने अपघातातील तिघांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. लासुर स्टेशन येथे कामानिमित्त आलेल्या मध्यप्रदेशातील तीन मजूर मोटरसायकल क्रमांक एम पी १० एम आर ८२ ८९ ने मध्य प्रदेशाकडे जात असताना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तेलवाडी वाल्मीक नाईक डी फार्मसी कॉलेज समोर अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने गुलाबसिंग साधु बरडे (वय २७) रा पिंपळ्या (मध्यप्रदेश) विनोद सुरसिंग बरडे (वय ३०) रा पिंपळ्या (मध्यप्रदेश) या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर रामु शंकर पटेल (वय ३५) रा शेंदवा (मध्यप्रदेश) हा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच उपविभागी पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड, शहर पोलीस निरीक्षक रघुनाथ सानप ,पोलीस उपनिरीक्षक चांद मेंढके ,पोलीस कर्मचारी संजय आटोळे ,दिनेश खेडकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील तिघांना शहर पोलीस आणि ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ माटे यांनी या तिघांची तपासणी केली असता दोन जणांना मृत घोषित केले तर एकावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.