

Cannabis cultivation in sugarcane field uncovered
बिडकीन, पुढारी वृत्तसेवा : बिडकीन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोहगाव बिट अंतर्गत मुलानी वाडगाव शिवारात उसाच्या पिकामध्ये लपवून ठेवलेली गांजाची झाडे जप्त करत बिडकीन पोलिसांनी धडक कारवाई केली. या प्रकरणी शेतमालक सुभाष अन्ना औटे (६०, रा. मुलानी वाडगाव) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मुलानी वाडगाव शिवारातील गट क्रमांक ५२ मधील उसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पहाटेपासून पोलिसांच्या पथकाने शेत परिसरात पाहणी केली. तपासणीदरम्यान उसाच्या पिकात लपवून ठेवलेली गांजाची सहा झाडे आढळून आली. त्यानंतर शेतमालकाला ताब्यात घेऊन चौकशी करण्सात आली. यरकारी पंचांसमक्ष पंचनामा करण्यात आला.
पैठण उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश शेळके यांच्या फिर्यादीवरून बिडकीन पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश शेळके करीत आहेत. सदर कारवाईत सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश शेळके, बीट जमादार योगेश नाडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय चव्हाण, वाल्मीक निकम, वाघमोडे आणि स्वप्नील दिलवाले यांनी सहभाग घेतला.
झाडांचे एकूण वजन ३१ किलो
या कारवाईदरम्यान पैठण तहसीलचे नायब तहसीलदार, कृषी अधिकारी, स्थानिक तलाठी व पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत जप्तीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या गांजाच्या झाडांचे एकूण वजन ३१ किलो असून, त्याची अंदाजे ३ लाख १० हजार रुपये इतकी बाजार किंमत असल्याचे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.