

Bus driver killed after crashing into a trolley loaded with sugarcane
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : अहिल्यानगर महामार्गावर लक्ष्मी माता मंदिराजवळ रस्त्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीवर भरधाव खासगी बस आदळून भीषण अपघात झाला. धडक एवढी भीषण होती की, बसच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला असून, बसचालक जागीच ठार झाला. तर बसमधील २५ कामगार जखमी झाले. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर तर एकाची अत्यंत चिंताजनक आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.३) मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडला.
शीतलसिंग उमरसिंग जाधव (५५, रा. मयूरपार्क, हर्मूल) असे अपघातात मृत बसचालकाचे नाव असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक विवेक जाधव यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूजकडून कामगारांची ने-आण करणारी खासगी बस (एमएच २०, जीव्ही ९३३९) मध्यरात्री शहराच्या दिशेने येत होती. याच वेळी अहिल्यानगर रोडवरील लक्ष्मी माता मंदिराजवळ एक उसाने भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली (एमएच २०, जीके ००६०) रस्त्याच्या मधोमध उभी होती.
अंधारात या ट्रॉलीला कोणतेही रिफ्लेक्टर किंवा दिशादर्शक फलक लावलेले नव्हते. बसचालक शीतलसिंग जाधव यांना रस्त्याचा आणि ट्रॉलीचा अंदाज न आल्याने सुसाट वेगात असलेली बस थेट त्या ट्रॉलीवर जाऊन धडकली. उपनिरीक्षक सुरेश माळी यांच्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात बेजबाबदारपणे ट्रॉली उभी करणारा ट्रॅक्टरचालक आणि मृत बसचालक, या दोघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पसार ट्रॅक्टरचालकाचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक सूर्यकांत शेंबळे करत आहेत.
कामगारांचा जीव धोक्यात
ही धडक इतकी भीषण होती की, बसचालक शीतलसिंग यांचा जागीच मृत्यू झाला. या बसमध्ये सुमारे ४० प्रवासी होते. त्यापैकी २५ जण जखमी झाले आहेत. रात्री गस्तीवर असलेले उपनिरीक्षक सुरेश माळी आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमींना खासगी रुग्णालयात तर किरकोळ जखमींना इतर रुग्णालयांत उपचारासाठी दाखल केले आहे.