

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील नगरपरिषद निवडणुकांचे राजकीय रणांगण आता केवळ प्रचारापुरते मर्यादित न राहता, त्याला अघोरी कृत्यांचे ग्रहण लागले आहे. धाराशिवमधील परंडा येथील घटनेनंतर आता पैठणमध्येही निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांना लक्ष्य करण्यासाठी काळ्या जादूचा वापर करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विरोधी पक्षातील उमेदवारांच्या फोटोंना सुया टोचणे, लिंबू, नारळ आणि बिब्बे अशा वस्तूंच्या माध्यमातून करणी-भानामती करण्याचा प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पैठण नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणूक लढवत असलेल्या मंगल कल्याण मगरे यांच्या घराबाहेर गुरुवारी सकाळी जादूटोण्याची एक टोपली आढळून आली. या टोपलीमध्ये नारळ, हळद-कुंकू, लिंबू, गुलाल, अगरबत्ती आणि विशेष म्हणजे उमेदवार मंगल मगरे व त्यांचे पती कल्याण मगरे यांचे सुया खुपसलेले फोटो होते. हा प्रकार केवळ एका उमेदवारापुरता मर्यादित नसून, ठाकरे गटाच्या सर्व 25 उमेदवारांच्या पोस्टरवरचे फोटो कापून त्यांचा वापर अशा अघोरी कृत्यासाठी करण्यात आल्याचा दावा कल्याण मगरे यांनी केला आहे.