

बिडकीन : छत्रपती संभाजीनगर–पैठण महामार्गावरील चितेगाव (ता. पैठण) येथील व्हिडिओकॉन कंपनीसमोर ४ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दीड वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. एका अज्ञात व्यक्तीकडून अपघाताची माहिती मिळताच बिडकीन येथील लघाने पाटील पार्क परिसरात उभी असलेली रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी धावली.
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थान, नानिजधाम यांच्या रुग्णवाहिकेचे चालक राजू चव्हाण यांनी वेळ न दवडता गंभीर जखमी अवस्थेतील तरुणाला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले, आणि परिसरात शोककळा पसरली. आज दुपारी साधारणताः दीड वाजे च्या सुमारास पैठण दीशेकडुन छ. सभांजी नगर कडे जाणारा हायवा व विरुध्द दीशे कडे येणारी मो. सा. ची समोरा समोर धडक झाल्याने मो. सा. चालक तरुण मुलाचा जीवावर बेतले
मृत तरुणाचे नाव सचिन नारायण लोखंडे (वय २४, रा. चिकलठाणा, ता. व जि. छत्रपती संभाजीनगर) असे असून तो आपल्या दुचाकीवर (एमएच २० एच एल २११७) जात असताना समोरून भरधाव येणाऱ्या हायवा (एमएच ४० सीएम ९५२०) ने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला आणि सचिन गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत पडला.
हा अपघात केवळ एक घटना नसून, बिडकीन–चितेगाव मार्गावरील वाढत्या अपघातांची भीषणता पुन्हा एकदा समोर आणणारा आहे. या मार्गावर दिवसेंदिवस भरधाव धावणाऱ्या जड वाहनांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून, हा रस्ता आता “मृत्यूचा सापळा” बनत चालला आहे. एका कुटुंबाचा तरुण मुलगा अचानक निघून गेल्याने त्यांच्या आयुष्यात काळोख दाटला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, प्रशासनाने या मार्गावरील वेगमर्यादा व सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.