

Sandipan Bhumre Driver Land Gift Deed Matter
छत्रपती संभाजीनगर : एकीकडे दीडशे कोटी रुपयांच्या जमिनीच्या मालकीचे गूढ आणि दुसरीकडे पोलिसांच्या प्रश्नांची सरबत्ती... या दुहेरी दबावामुळे खासदार संदिपान भुमरे यांचे चालक जावेद शेख यांचा रक्तदाब वाढल्याचे समोर आले आहे.
सालारजंग मालमत्ता प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि.30) तब्बल नऊ तास चौकशी केल्यानंतर, मंगळवारी (दि.1) पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत शेख यांनी चौकशीसाठी पाच दिवसांची मुदत मागितली आहे.
जालना रोडवरील दाऊदपुरा भागात असलेली सालारजंगची सुमारे १५० कोटी रुपये किमतीची मोक्याची जमीन, खासदार संदिपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांचे चालक जावेद शेख यांच्या नावे 'हिबानामा' (बक्षीसपत्र) करून देण्यात आली आहे. एवढी मोठी मालमत्ता एका सामान्य चालकाच्या नावे झाल्याने हे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. याच प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीचा फास आवळला आहे.
सोमवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी जावेद शेख यांना चौकशीसाठी बोलावले. तब्बल नऊ तास चाललेल्या या चौकशीत पोलिसांनी त्यांच्यावर ३५ प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, शेख यांच्याकडून मिळालेल्या उत्तरांनी पोलिसांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांना मंगळवारी पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.
मंगळवारी चौकशीला हजर राहण्याऐवजी, जावेद शेख यांच्या वतीने पोलिसांना एका खासगी रुग्णालयाचे पत्र सादर करण्यात आले. यामध्ये शेख यांचा रक्तदाब वाढला असून, त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याचे म्हटले आहे. याच पत्राच्या आधारे त्यांनी तपासाला सामोरे जाण्यासाठी पाच दिवसांचा अवधी मागितला आहे. अचानक बिघडलेली प्रकृती आणि चौकशीसाठी मागितलेली मुदतवाढ, यामुळे या प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे. आता पोलीस यावर काय निर्णय घेतात आणि पाच दिवसांनंतर जावेद शेख चौकशीला सामोरे जातात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.