

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बार्टीने संशोधक विद्यार्थ्यांची फेलोशिप बंद केल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेच्या सुनावणीवेळी खंडपीठाने बार्टीला नोटीस बजावली आहे.
याशिवाय पुढील सुनावणीपर्यंत याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांचे पीएचडीचे प्रवेश रद्द करू नयेत, असे आदेशही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला दिले आहेत. सन २०१९-२० यावर्षी एम. फिलसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन संस्थेमार्फत (बार्टी) अधिछात्रवृत्ती मंजूर झाली होती.
ही फेलोशिप एम. फिल पूर्ण होईपर्यंत सुरू होती. मात्र २०२३ मध्ये अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर कोणत्या कारणाशिवाय पीएचडीसाठी सुरू राहणारी फेलोशिप बार्टीने बंद केली. याबाबत संशोधक विद्यार्थ्यांनी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला होता. मात्र त्यातून ठोस कारण समोर आले नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएचडीसाठी तत्कालीन कुलगुरूंनी तात्पुरता प्रवेश दिला होता. त्यानंतर बार्टीने फेलोशिप नाही दिली तर विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द समजण्यात येईल, असे परिपत्रक विद्यापीठाने काढले. त्यामुळे वाल्मीक वाघ, अरविंद भूतकर, सतीश कांबळे आणि सुधीर जगताप यांनी अॅड. महेश भोसले यांच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
बार्टीन तात्काळ फेलोशिप सुरू करून विद्यापीठाचे परिपत्रक रद्द करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. प्राथमिक सुनावणीत गुरुव- ारी फेलोशिप अडविल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे यांनी सामाजिक न्याय विभाग, बार्टीच्या संचालक आणि कुलगुरूंना नोटीस बजावली आहे. पुढील सुनावणी २४ ऑक्टोबरला होणार आहे.