

Avoiding the royal pomp of his son's marriage, he gave a fund of Rs 1 crore to farmers
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एका बाजूला मुलाच्या विवाहाचे आनंदमय वातावरण, तर दुसरीकडे दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेली शेतकरी कुटुंबे, अशा परिस्थितीत स्वतःच्या आनंदापेक्षा समाजाच्या वेदनांना प्राधान्य देत मंत्री अतुल सावे-उद्योजक अजित मुळे परिवाराने एक संवेदनशील निर्णय घेतला. त्यांनी मुलाच्या विवाह सोहळ्याचा शाही थाट टाळत अगदी साध्या पद्धतीने घरगुती विवाह करण्याचे ठरविले आहे. अन् विवाहावर होणाऱ्या खर्चाच्या रकमेत आणखी भर टाकत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल १ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी बुधवारी (दि. ४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाधिन केला.
सावे परिवारातील धाकटे सुपुत्र आणि उद्योजक अनुराग यांचा विवाह छत्रपती संभाजीनगर येथील उद्योजक अजित मुळे यांची कन्या ईशा यांच्यासोबत येत्या २५ नोव्हेंबर रोजी नियोजित आहे. स्व. मोरेश्वर सावे यांच्यापासून सावे परिवाराने सामाजिक कार्य आणि उद्योग क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मुळे परिवारही उद्योग क्षेत्रात अग्रणी आहे त्यामुळे या विवाह सोहळ्यासाठी दोन्ही परिवाराचे नातेवाइकांसह मित्रपरिवार, विविध क्षेत्रांतील हजारो परिचितांना सहभागी करून घेण्याचे नियोजन होते. मात्र, राज्यावर ओढवलेले दुष्काळाचे संकट आणि शेतकऱ्यांची बिकट अवस्था लक्षात घेता, मोठ्या शाही थाटामाटात विवाह साजरा करणे योग्य ठरणार नाही, अशी भावना दोन्ही परिवारांनी व्यक्त केली.
अन् त्यानुसार साध्या पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेत विवाहावर होणारा खर्चात आणखी काही निधीची भर टाकूण तो निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला. बुधवारी मंत्री सावे व उद्योजक मुळे यांनी या १ कोटी रुपयांच्या निधीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाधीन केला. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अजिक्य सावे यांची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांच्या वेदनांची जाणीव
आज मराठवाड्यातील अनेक शेतकरी बांधव शेतीचे नुकसान, आर्थिक अडचणी आणि दुष्काळाच्या संकटाचा सामना करत आहेत. असे असताना हजारो लोकांच्या उपस्थितीत मोठा विवाह सोहळा आयोजित करण्यापेक्षा संकटात सापडलेल्या कुटुंबांची मदत करणे योग्य ठरेल, असा विचार करुन हा आनंदाचा क्षण संकटात सापडलेल्यांना आनंद देत साजरा करावा, असे सावे-मुळे कुटुंबाने ठरवले आहे