

Attempted burglary by locking the homeowner upstairs
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : घरात कुटुंबीय झोपलेले असताना त्यांना वरच्या मजल्यावर बाहेरून कडी लावून कोंडत, खालील बंद घराचे कुलूप तोडणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना 'डायल ११२' आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सतर्कतेमुळे मुकुंदवाडी पोलिसांनी रंगेहात बेड्या ठोकल्या. हा प्रकार शनिवारी (दि. २४) मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास सिडको विठ्ठलनगर परिसरातील पी-३ भागात घडला. पोलिसांची गाडी येताच दरवाजाच्या आडोशाला लपून बसलेल्या या दोन्ही चोरट्यांची घरमालकाने वरूनच पोलिसांना माहिती दिल्याने पोलिसांच्या पथकाने झडप घालून दोघांना शस्त्रांसह ताब्यात घेतले.
याप्रकरणी अनिल अंबादास माळवे (४५) आणि राहुल संजय जाधव (२२, दोघे रा. प्रकाशनगर पश्चिम, गल्ली नं. ५, मुकुंदवाडी, छत्रपती संभाजीनगर) या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.
याप्रकरणी फिर्यादी सुहास सुधाकर चौधरी (३२, रा. विठ्ठलनगर, सिडको) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे विठ्ठलनगर येथे दोन मजली घर आहे. ते स्वतः पहिल्या मजल्यावर राहतात, तर तळमजल्यावरील घरामध्ये सामान ठेवलेले असून ते नेहमी बंद असते. २४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास चौधरी हे घरात झोपलेले असताना, त्यांच्या दरवाजाची कडी बाहेरून कोणीतरी लावत असल्याचा आवाज त्यांना आला.
त्यानंतर लगेचच तळमजल्यावरील बंद घराचा दरवाजा ठोठावण्याचा आणि कुलूप उचकटण्याचा आवाज आला. त्यामुळे चौधरी यांनी तात्कळ स्वतःच्या मोबाईलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता, दोन इसम तळमजल्यावरील दरवाजा लोखंडी गजाने तोडताना दिसले.
चौधरी यांनी प्रसंगावधान राखले. त्यांनी कसलाही आरडाओरड न करता तातडीने मोबाईलवरून पोलिस नियंत्रण कक्षाच्या 'डायल ११२' क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलिस ठाण्याचे गस्तीवरील पथक अवघ्या काही मिनिटांत सायरन वाजवत घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांचे वाहन घरासमोर येताच दोन्ही चोरटे घाबरले आणि त्यांनी पळून जाण्याचा मार्ग बंद झाल्याने तळमजल्यावरील मुख्य दरवाजाच्या आडोशालाच लपून बसले. चौधरी यांनी पहिल्या मजल्यावरून पोलिसांना फोन करून, चोरटे दरवाजाच्या बाजूलाच लपून बसले आहेत, अशी अचूक माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ त्या दिशेने धाव घेऊन दोघांनाही ताब्यात घेतले. दोघांकडून घरफोडीसाठी आणलेले दोन लोखंडी गज आणि दोन धारदार चाकू असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
दोघेही सराईत गुन्हेगार
अनिल माळवे हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध दरोडा, लूटमार, घरफोडी घरफोडी, खंडणी, गांजा विक्री संदर्भात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्का व एमपीडीए अंतर्गत कारवाईही झालेली आहे. तसेच राहुल जाधव याच्यावरही यापूर्वी गंभीर गुन्हे नोंद आहेत.