Rangin Darwaja : सहा महिन्यांपासून रंगीन दरवाजाच्या दुरुस्तीकडे पुरातत्त्व विभागाची पाठ

तुटलेला भाग झाकला पत्र्याच्या आवरणाने : ऐतिहासिक वारशाच्या देखभालीबाबत इतिहासप्रेमींची नाराजी
सहा महिन्यांपासून रंगीन दरवाजाच्या दुरुस्तीकडे पुरातत्त्व विभागाची पाठ
सहा महिन्यांपासून रंगीन दरवाजाच्या दुरुस्तीकडे पुरातत्त्व विभागाची पाठfile photo
Published on: 
Updated on: 

Archeology department's back to repair rangin darwaja since six months

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ऐतिहासिक दरवाजांची नगरी म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगरात एकेकाळी ५२ दरवाजे होते. त्यापैकी आज केवळ आठ दरवाजे अस्तित्वात आहेत. शहराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणाऱ्या या वास्तूंच्या जतनाची जबाबदारी राज्य पुरातत्त्व विभागावर असताना, जिल्हाधिकारी निवासस्थानासमोरील रंगीन दरवाजाच्या तुटलेल्या भागाची सहा महिन्यांनंतरही दुरुस्ती झालेली नाही. पडझड झालेल्या भागावर पत्रा लावून तो झाकण्यापुरतीच कार्यवाही करण्यात आल्याने ऐतिहासिक वारशाच्या देखभालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

रंगीन दरवाजा ही केवळ ऐतिहासिक वास्तू नसून शहराच्या सांस्कृतिक वैभवाची ओळखही आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या परिसरात असलेला हा दरवाजा अजिंठा लेण्यांकडे जाणाऱ्या मार्गावर आहे. त्यामुळे या मार्गावरून दररोज ये-जा करणाऱ्या नागरिकांसह देश-विदेशातील पर्यटकांचेही लक्ष या वास्तूकडे वेधले जाते. काही वर्षांपूर्वी या दरवाजाची दुरुस्ती करून रंगरंगोटी करण्यात आली होती.

मात्र, ऊन, पाऊस आणि धुळीच्या माऱ्यामुळे रंगाची चमक कमी झाली आहे. त्यातच सहा महिन्यांपूर्वी रस्त्यालगतचा दरवाजाचा एक भाग तुटून पडला. या घटनेनंतर संबंधित विभागाने तुटलेल्या भागावर पत्रा लावून पडझड झाकली; मात्र प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम अद्याप सुरू झालेले नाही. या ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करण्याऐवजी पडझड झालेला भाग पञ्याआड लपविण्याची भूमिका कितपत योग्य, असा सवाल इतिहासप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे. पर्यटकांच्या नजरेस पडणाऱ्या या महत्त्वाच्या वास्तूची तातडीने दुरुस्ती करून तिचे मूळ सौंदर्य जपावे, अशी मागणी होत आहे.

५२ दरवाजांपैकी आठच शिल्लक

ऐतिहासिक दरवाजांसाठी प्रसिद्ध असलेल्या छत्रपती संभाजीनगरात एकेकाळी ५२ दरवाजे होते. काळाच्या ओघात त्यातील बहुतांश दरवाजे नामशेष झाले. आता अस्तित्वात असलेल्या आठ दरवाजांचे जतन करणे ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. मात्र, रंगीन दरवाजाच्या दुरवस्थेमुळे संवर्धनाच्या कामावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

पर्यटकांच्या नजरेसमोरच पडझड

जिल्हाधिकारी निवासस्थानासमोरील रंगीन दरवाजा अजिंठ्याकडे जाणाऱ्या मार्गावर असल्याने पर्यटकांच्या नजरेस पडतो. सहा महिन्यांपासून तुटलेल्या भागावर पत्रा लावून ठेवण्यात आला आहे. प्रत्यक्ष दुरुस्ती रखडल्याने शहराच्या ऐतिहासिक वैभवाचे जतन नेमके कसे होते, असा सवाल इतिहासप्रेमी उपस्थित करीत आहेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.