

Application process for the second phase of the housing scheme has begun
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेसाठी दुसऱ्या टप्प्यातील अर्ज प्रक्रियेला २७ एप्रिलपासून सुरुवात झाली असून, १८ मेपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण ११,१२० घरांचे बांधकाम प्रस्तावित असून त्यापैकी ७,४८२ घरांसाठी या योजनेच्या निकषात बसणाऱ्या इच्छुक लाभार्थींकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली.
शहरातील पाच गृहप्रकल्पांची कामे सध्या सुरू असून सुमारे २४ हेक्टर क्षेत्रावर ही घरे उभारली जात आहेत. पहिल्या टप्प्यातील अजींची सोडत काढण्यात आली असून ३,६३८ घरांसाठी लाभार्थ्यांनी स्वीकृती दर्शवली आहे. उर्वरित ७,४८२ घरांसाठी आता नव्याने अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून १८ मे पर्यंत अर्ज करता येणार आहेत.
ही निवड प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी म्हाडा लॉटरीच्या धतीवर ऑनलाईन सोडत पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या या योजनेअंतर्गत पडेगाव, सुंदरवाडी, हर्मूल आणि तिसगाव येथे गृहप्रकल्प आकार घेत आहेत.
पडेगाव गट क्र.६९, सुंदरवाडी गट क्र.९ व १०, तिसगाव गट क्र. २२५/१ व २२७/१ तसेच हर्सल गट क्र. २१६ या ठिकाणी एकूण ११,१२० घरे उभारली जात आहेत. विविध बांधकाम कंपन्यांना या प्रकल्पांची जबाबदारी देण्यात आली आहे. या योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ व पारदर्शक ठेवण्यावर महापालिकेकडून भर दिला जात असून पात्र लाभार्थींना घरांचे स्वप्न पूर्ण करण्याची ही मोठी संधी मानली जात आहे.
या जागांवर सुरू आहेत प्रकल्प
हसूल गट क्र. २१५/१ ७.६४ हेक्टर
हसूल गट क्र. २३५ ६.८६ हेक्टर
चिकलठाणा गट क्र.२३३ ५.३४ हेक्टर
चिकलठाणा गट क्र. २४२ ७.३६ हेक्टर
चिकलठाणा गट क्र. २३६ ९.२४ हेक्टर