

साहिल पटेल
छत्रपती संभाजीनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या कामाच्या प्रचंड वेगासाठी ओळखले जाणारे अजित पवार यांचे बुधवारी (दि.२८ जानेवारी) दुर्दैवी विमान अपघातात निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.
अजित दादांच्या अचानक जाण्याने राजकीय क्षेत्रातील एक धडाडीचे नेतृत्व हरपले आहे. आज त्यांच्या आठवणींना उजाळा देताना बीडकरांच्या डोळ्यासमोर उभा राहतोय तो ८ ऑगस्ट २०२५ चा दिवस... ज्या दिवशी दादांनी पहाटे ५:३० वाजता अधिकाऱ्यांची झोप उडवली होती.
बीडच्या पालकमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अजित पवार यांचा तो पहिलाच मोठा दौरा होता. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणानंतर उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीमुळे धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर बीड जिल्ह्याची जबाबदारी अजित दादांच्या खांद्यावर आली. पालकमंत्री बदलला की कामाची पद्धत बदलते, पण अजित दादांनी तर वेळापत्रकच बदलून टाकले. ८ ऑगस्टच्या त्या पहाटे, साडेपाच वाजता (५:३०) बीडमधील विश्रामगृहाचे दरवाजे उघडले आणि अजित पवार यांचा ताफा बाहेर पडला.
सर्वसाधारणपणे मंत्र्यांचे दौरे सकाळी ९ किंवा १० वाजता सुरू होतात. पण, अजित पवार यांनी पहाटे ५:३० लाच चंपावती क्रीडा मंडळाच्या मैदानावर एन्ट्री घेतली. नियोजित वेळेच्या एक तास आधीच 'दादा' हजर झाल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांची एकच पळापळ झाली. काहींचे फोन खणखणले, तर काही अधिकारी धावत-पळत घटनास्थळी पोहोचले. चंपावती क्रीडा संकुलात खेळाडूंची सोय, मैदानाची स्थिती आणि साफसफाई पाहिल्यानंतर त्यांनी थेट शहराचा रुख केला. यावेळी नगरपालिकेच्या ढिसाळ कारभारावर त्यांनी तिथेच 'ऑन द स्पॉट' अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. "मला काम चोख पाहिजे, हलगर्जीपणा खपवून घेणार नाही," या त्यांच्या शब्दांनी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते.
आरोग्य विभागाला दिलेला 'डोस'
केवळ क्रीडा संकुलच नाही, तर आरोग्य विभागाच्या कामाचाही त्यांनी पहाटेच आढावा घेतला. जिथे चांगले काम दिसले तिथे अधिकाऱ्यांचे कौतुक केले, पण जिथे त्रुटी आढळल्या तिथे कानउघाडणी करण्यासही ते विसरले नाहीत. पहाटे ५:३० पासून सुरू झालेला हा 'नॉन-स्टॉप' दौरा सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होता. त्यानंतर ते वडवणीकडे रवाना झाले.
एक शिस्तप्रिय पर्वाचा अंत
बीडच्या इतिहासात कोणत्याही नेत्याने पहाटे ५:३० वाजता विकासकामांची पाहणी केल्याचे हे पहिलेच उदाहरण होते. अजित पवार हे केवळ नावापुरते 'पालक' नव्हते, तर प्रशासनाला शिस्त लावणारे शिस्तप्रिय मंत्री होते, हे त्यांनी त्या दिवशी दाखवून दिले होते.