

छत्रपती संभाजीनगर : अजिंठा अर्बन को. ऑप. बँकेत सुमारे २१ कोटी ५६ लाख ११ हजार ५६५ रुपयांचा एफडी घोटाळा उघडकीस आला आहे. २००६ ते २०२३ या काळात अनेक एफडीधारकांचे पैसे परस्पर काढून त्यातून ३६ एफडी अगेन्स्ट लोनची परतफेड करून अपहार करण्यात आला. या प्रकरणी अध्यक्ष सुभाष झांबड यांच्यासह ६८ आरोपींविरुद्ध मंगळवारी (दि. २४) सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी चेतन सुभाष भारुका (४३, रा. सुवर्णमध्ये अपार्टमेंट, भाग्यनगर) यांच्या तक्रारीनुसार, ऑगस्ट २०२२ मध्ये अजिंठा बँकेचा जाधवमंडी शाखेचा व्यवस्थापक चेतन गादिया आणि उस्मानपुरा शाखेची व्यवस्थापक दिपाली कुलकर्णी यांनी भारुका यांची भेट घेतली. त्यांना इतर बँकांपेक्षा अजिंठा बँक एफडीवर जास्तीचा व्याजदर देते, असे सांगितले. त्यानंतर भारूका यांनी अजिंठा अर्बन बँकेच्या जाधवमंडीच्या शाखेत त्यांची मुलगी दित्या हिच्या नावाने १५ महिन्यांकरीता पाच लाख रुपयांची रक्कम मुदतठेव (एफडी) केली होती. त्यांना ११ टक्के परतावा आणि पाहिजे तेव्हा पैसे परत करण्याची हमी दिली होती. आरोपींनी ही रक्कम भारुका यांच्या संमतीशिवाय परस्पर काढून घेत सोपान डमाळे पाटील यांच्या एफडीओडी कर्जाची परतफेड केली. आरोपींनी या प्रकरणात भारुका यांची एकूण ११ लाख ३५ हजाराची फसवणूक केली आहे.
बँकेचे चेअरमन सुभाष माणकचंद झांबड, संचालक घेवरचंद मोतीलाल बोथरा, तनसुख माणकचंद झांबड, नवीनचंद संघवी, राजेंद्रसिंग जबिंदा, जितेंद्र मुथा, संजय फुलपगर, हरीष भिकचंद चिचाणी, सुशील बलदवा, महेश मन्साराम जसोरीया, सोपान तुळशीराम शेजवळ, उमेश डोंगरे, माणिक चव्हाण, रजनी देसरडा, माधुरी अग्रवाल, अनिल धर्माधिकारी, रवींद्र वाणी, संजय मिठालाल कांकरीया, शिरीष गादिया, दादासाहेब गंडे, नितीन रतनलाल मुगदिया, विद्या प्रफुल्ल बाफना, कांचन श्रीमंतराव गोर्डे, अब्दुल पटणी, सुनील शंकरलाल सवईवाला, दिलीप हिराचंद कासलीवाल तसेच बँकेचे अधिकारी सीईओ प्रदीप एकनाथ कुलकर्णी, मुख्य व्यवस्थापक संदेश भिवसन वाघ, शाखा व्यवस्थापक चेतन खुशालचंद गादिया, दीपाली देवेंद्र कुलकर्णी तसेच एफडीओडीचे कर्जदार सुभाष जैन, राजू बाचकर आदींसह ६८ जणांचा संशयित आरोपींमध्ये समावेश आहे.